साश्रू नयनांनी अनेकांनी घेतले तात्यांचे अंत्यदर्शन


खंडाळा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हयाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी गुरुवारी अखेरचा श्‍वास घेतला. मुंबईहून त्यांचे पार्थिव खंडाळा येथे आल्यावर हजारो कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. तात्यांच्या आठवणींनी खंडाळकर जनता शोकसागरात बुडाली होती. तर सातार्‍यात विकासनगरमधील तात्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणल्यावर तेथेही अनेकांनी अंत्यदर्शन घेवून त्यांना अभिवादन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही सातार्‍यात येवून तात्यांना श्रध्दांजली अर्पण केली.


लक्ष्मणराव पाटील गेली काही वर्षे पार्किनसन्स या दुर्धर आजाराने त्रस्त होते. सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मुंबईला जसलोेक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे तीनही सुपूत्र मिलिंद पाटील, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांच्यावरच्या उपचारात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. कार्यकर्त्यांनीही लक्ष्मणतात्यांच्या प्रकृतीसाठी ईश्‍वराकडे प्रार्थना सुरू केली होती. मात्र गुरुवारी पहाटे लक्ष्मणराव पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा, वाई , खंडाळा , महाबळेश्‍वर तालुक्यासह अवघ्या जिल्ह्यावर शोककळा पसरली.


मुंबईहून आज (गुरुवार) त्यांचे पार्थिव जिल्ह्यात महामार्गावर शिरवळ, खंडाळा येथे आणण्यात आल्यावर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. मुंबईहून पार्थिव येईपर्यंत खंडाळयात जमलेल्या लोकांमध्ये तात्यांबाबतच्या आठवणींचीच चर्चा सुरू होती. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, सभापती मकरंद मोटे, कृषी सभापती मनोज पवार, जि .प. सदस्य उदय कबुले, बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, पं. स. सदस्य चंद्रकांत यादव, आश्‍विनी पवार, लताताई नरुटे, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके आदींनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सातार्‍यात विकासनगरमधील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आल्यावर तेथेही अनेकांनी तात्यांना साश्रू नयनांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रवादी भवनात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget