Breaking News

सामूहिक बलात्कारप्रकरणी महिलेसह चौघांना सक्तमजुरी


पुणे/प्रतिनिधीः
शाळेला सुट्टी असताना नातेवाइकांकडे राहण्यास आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामूहिक बलात्कारात न्यायालयाने सहआरोपी महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील ही पहिलीच शिक्षा आहे.


मनोज सुरेश जाधव (21), वर्षा धनराज गायकवाड (32), अजय दीपक जाधव (22) (तिघेही रा. सर्वोदय कॉलनी, आनंदनगर, मुंढवा) आणि प्रशांत गुरूनाथ गायकवाड (28, रा. रक्षकनगर, खराडी) अशी शिक्षा सुनाविन्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान रक्षकनगर, केशवनगर, मुंढवा येथील पिंगळे वस्ती हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी मेहर यांनी गुन्ह्याचा तपास केला. 


बारा वर्षांची पीडित मुलगी नातेवाइकांकडे सुट्टीसाठी आली होती. तिला आरोपी वर्षा ही रक्षकनगर येथील आरोपी प्रशांत गायकवाड याच्या फ्लॅटवर घेऊन गेली. तेथे प्रशांतने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी मनोज जाधव याच्याबरोबर गप्पा मारण्यास बसविले. दरम्यान, वर्षाने मनोज तुला कसा वाटतो, तू त्याच्याशी बोलत जा. त्याच्याबरोबर लग्न कर, शरीर संबंध ठेव, असे सांगून सगळी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर वर्षा हिच्यासमोर इतर तीनही आरोपींनी पीडितेवर मुंढवा येथील सर्वोदय कॉलनीतील राहत्या घरी बलात्कार केला. याच दरम्यान, 14 मे 2016 रोजी वर्षाने पीडितेला मुंढवा येथील पिंगळेवस्ती येथील सदनिकेत नेले. प्रशांत आणि अजयने तिचे हात पाय धरले. त्यानंतर मनोजने तिच्यावर बलात्कार केला. अ‍ॅड. कावेडिया यांनी सात साक्षीदार तपासले. ज्या महिलेने अशा प्रसंगात पीडित मुलीला संरक्षण देण्याची गरज होती, तिनेच इतर आरोपींच्या वाईट कृत्यास साथ देऊन पीडितेला मानसिक धक्का पोहचेल असे कृत्य केले, असा युक्तीवाद अ‍ॅड. कावेडिया यांनी करताना चौघांनाही जास्तीत-जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.


खटल्यात मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. न्यायालयाने बलात्कार, सामूहिक बलात्कार, संगनमत, विनयभंग, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये चौघाही आरोपींना शिक्षा सुनावली.