Breaking News

‘एफआरपी’प्रश्‍नी स्वाभिमानीचा आजपासून आंदोलनाचा इशारा


कराड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होऊन दोन महीने पूर्ण झाले आहेत तरी अद्याप साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे बिले आदा केलेली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेतर्फे निवासी उपजिल्ह्याधिकारी सचिन बारावकर यांना निवेदन देवून एफआरपीनुसार दर न देणार्‍या साखर कारखानदारांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा उद्यापासून (गुरूवार) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, कोअर कमिटीचे अध्यक्ष अलीभाई इनामदार, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, कराड उत्तरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, कराड शहराध्यक्ष मनोज जाधव, रहिमतपूरचे अध्यक्ष विक्रम थोरात, मनोज ढाणे, संजय साबळे, जीवन शिर्के, बी. जी. साबळे, अनिल बाबर, दादा यादव उपस्थित होते

जिल्ह्याधिकार्‍यांच्या उपस्थित दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील साखर कारखाने प्रतिनिधी, शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक झाली होती. यावेळी चालू गळीत हंगामातील ऊसाचा एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचा व मागील हंगामातील थकित देणे एक महिन्यापूर्वी अदा करण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले होत. एक महिन्यात बिले न दिल्यास साखर कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी यांनी जिल्ह्या पोलीस प्रमुखांना दिले होते। परंतु आज दोन महीने पूर्ण होऊन ही शेतकर्‍यांना ऊस बिल मिळाली नाहीत.

ऊस दर नियंत्रण क़ायदा 1966 च्या कलम तीन अनुसार शेतकर्‍यांना ऊस गाळप झाल्यापासुन 14 दिवसांत पूर्ण झाल्यानंतर एकरकमी एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक असताना आज काही कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. तसेच काहींनी पूर्ण रक्कम थकित ठेवली आहे. त्यामुळे संबंधित कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.