Breaking News

नीरव मोदी, मल्ल्याला पळून जाण्यास वर्मांची मदत? केंद्रीय दक्षता आयोगाचा आरोप; चौकशी सुरू


नवीदिल्लीः गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेले सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोगा (सीव्हीसी)ने आलोक वर्मा यांच्यावरील आणखी सहा आरोपांची चौकशी सुरू केली आहे. वर्मा यांनी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि एअरसेलचे माजी प्रमोटर सी. शिवशंकरन यांना मदत केल्याचा आरोप आहे. या तिघांविरुद्ध लूक आउट सर्क्युलरच्या आंतरिक इमेलला लीक करण्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे. 


केंद्रीय दक्षता आयोगाने सरकारला यासंबंधी माहिती दिली आहे. 12 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयासमोर वर्मा यांचा तपास अहवाल दाखल करण्यात आल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. सीबीआयचे विशेष माजी संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या आरोपाची दखल घेवून वर्मा यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सीव्हीसीने सीबीआयला 26 डिसेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे, की संबंधित सर्व कागदपत्रे आणि फाईली उपलब्ध करून त्याची चौकशी करण्यात यावी. नीरव मोदी प्रकरणी सीबीआयच्या काही आंतरिक ईमेलला लीक करण्यात वर्मा यांचा हात असल्याचा आरोप आहे. बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांचा तपास करणार्‍या तत्कालीन संयुक्त संचालक राजीव सिंह यांना एका खोलीत बंद करण्यात आले तसेच कम्प्युटरमधील डेटा प्राप्त करण्यासाठी सूचना प्रौद्योगिक मंत्रालयातील कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) यांनाही बोलावण्यात आले होते; परंतु हे सर्व कशासाठी केले होते, याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते, असे या पत्रात म्हटले आहे. 
एअरसेलचे सर्वेसर्वा असलेले सी. शिवशंकरन यांच्याविरूद्ध लूकआउट सर्क्युलर कमकुवत करण्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे. 600 कोटींचा बँक घोटाळा केलेल्या आरोपीला भारतातून जाण्यास परवानगी मिळाली. संयुक्त संचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने शिवशंकरन यांची पांच सितारा हॉटेलमध्ये जावून भेट घेतली. ही भेट बेकायदेशीर आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. या भेटीनंतर लूकआउट सर्क्युलर कमकुवत करण्यात आले, असा आरोप आहे. दरम्यान, सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आल्यानंतर वर्मा यांनी डीजी फायर सर्व्हिसेस अँड होमगार्ड या पदाचा तडकाफडकी काल राजीनामा दिला होता. वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले होते.