Breaking News

सरस्वती खैरमोडे यांची महिला समिती सभापतीपदी फेरनिवड


पाटण (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती सरस्वती उत्तमराव खैरमोडे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पाटण नगरपंचायतीच्या झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी श्रीमती सरस्वती खैरमोडे यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी खैरमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महिला व बालकल्याण सभापतीपदी काम करत असताना इतर नगरसेविकांच्या मदतीने खैरमोडे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, महिलांसाठी स्वतंत्र शिबीर, पाटण परिसरातील महिलांसाठी कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण, हळदी-कुंकू समारंभ, पाटणमधील अंगणवाड्यांना लोखंडी कपाटांचे वितरण असे विविध उपक्रम राबविलेे आहेत. 

आजवर नि:स्वार्थीपणे केलेल्या कामामुळे आणि सर्वांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासामुळेच सभापती पदी पुन्हा माझी निवड झाली आहे. या निवडीने माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असून यापुढील काळातही सर्वांना सोबत घेवून युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जोमाने काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, सर्व नगरसेवक, पाटण तालुका भोई समाज संघाचे अध्यक्ष हेमंत खैरमोडे, पाटण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, प्रताप सेवा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच प्रभाग क्र. 6 मधील नागरीकांनी अभिनंदन केले.