Breaking News

पालिकेच्या विशेष सभेवर भाजप नगरसेवकांचा बहिष्कार ‘सेव्हन स्टार’ मानांकनसाठी एकमताने ठराव



कराड.  (प्रतिनिधी) : ‘सेव्हन स्टार’ मानांकनसाठी सुरू असलेल्या व हाती घ्यावयाच्या कामाबाबात सोमवारी आयोजित केलेल्या विशेष सभेवर नगराध्याक्षा वगळता भाजपच्या सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. येथील पालिकेच्या सभागृहात नगराध्याक्ष सौ. रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील याच्यासह जनशक्ती व लोकशाही आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.
सभेत स्वच्छ सर्वेक्षण ‘सेव्हन स्टार’ मानांकनासाठी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये कचरा विघटनासाठी बकेट पुरविणे व कचरा क्रश करण्यासाठी कुट्टी मशीन खरेदी करणे, रूक्मिणीनगर येथे शौचालय परिसरात कॉन्क्रीटीकरण, मुरूम टाकणे व पत्रा उभारणे, प्लस्टिक बेलिंग मशीन पुरविणे, नागरिकांचे व नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्यांची काळजी घेणेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करून ते पुरविणे, तसेच ठिकठिकाणी कचरा टाकला जात असेल तेथे सीसीटीव्ही बसविणे आदि विषय हाती घेण्यात येणार असून याला एकमताने मंजूरी देण्यात आली.
कराड शहरात एकूण 43 मिळकत धारकांच्या खुल्या जागा असून त्या पडिक अवस्थेत आहेत. त्यामुळे तेथे झाडवेल वाढलेले असून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अस्वच्छता वाढून डासांची निर्मिती होवून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. तेव्हा नगरपरिषेदेकडून जेसीबी, ट्रक्टर व मजूर यांचा वापर करून स्वच्छ करून घेण्यात यावे. यासाठी येणारा खर्च संबधित मिळकत धारकांच्या घरपट्टीतून वसूल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
यावेळी केवळ नगरसेवक वैभव हिंगमिरे यांनी चिकन व मटण कचरा वाहतुकीसाठी येणारी गाडी ही गळकी असल्याने रस्त्याने कचरा सांडत जात असल्याने दुर्गंधी पसरत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांनी आजच्या सभेवरती बहिष्कार टाकला आहे. नववर्षाच्या मुहुर्तावर निवडी होणार आहेत, त्या पार पडल्यानंतर आम्ही बोलू, असे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.