Breaking News

राज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी


नागपूर : राज्यात सौभाग्य योजनेंतर्गत 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तसेच या योजनेत नागपूर जिल्ह्यातील 38 हजार 124 आणि विदर्भआतील 2 लाख 12 हजार 01 घरांसह राज्यातील 10 लाख 93 हजार 614 घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणने हे उद्दिष्ट निर्धारित तारखेच्या 4 दिवस आधी म्हणजे 27 डिसेंबर रोजीच पूर्ण केले. 

या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित करण्यात आली. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे.

सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात आले. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून 10 टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीज पुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीज पुरवठा देण्यात आला आहे.