Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार परिवर्तन यात्रेला गुरुवारी रायगडमधून सुरुवात

अलिबाग/ प्रतिनिधीः
देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेला गुरुवारी रायगडमधून सुरुवात झाली. सकाळी आठ वाजता पाचाड येथील राजमाता जिजाबाई यांचे समाधीस्थळ आणि किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परिवर्तन यात्रेला सुरुवात केली.

या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यासांरखे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. या भाजप सरकारवरचा लोकांचा विश्‍वास उडाला आहे, म्हणून परिवर्तन होणे गरजेचे आहे, अशी पवार यांनी दिली आहे. 400 वर्षांपूर्वी भारतात एकच बादशाह होता. तो दिल्लीत होता. मुंडे यांनी शिवसेना व भाजपच्या एकाधिकारशाहीविरोधात टीका केली. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या एकाधिकारशाहीविरोधात संघर्ष करून परिवर्तनाची सुरुवात केली. आज दिल्लीत नरेंद्र मोदी नामक तुघलकी निर्णय घेणारे बादशाह भारतावर राज्य करत आहेत. मुंबईतही हुकूमशाही सुरू आहे. या दोन्ही हुकुमशाह्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडपासून परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. 
मुंडे म्हणाले, की सरकारने साडेचार वर्षांत पदोपदी शिवरायांचा अपमान केला. शिवस्मारकाची एकही वीट ठेवली गेली नाही. शिवरायांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली; मात्र शेतकर्‍यांना मदत दिली गेली नाही. हा शिवरायांचा अपमान आहे. आंबेडकरांचाही अपमान होत आहे. आजवर घटना जाळण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती; पण मोदी यांच्या काळात घटना जाळली गेली. काही कारवाई करण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल मंत्री असताना ’भेल’सारखा प्रोजेक्ट इथे आणला. आज कोकणात एकही प्रकल्प का येत नाही,’ असा सवाल मुंडे यांनी केला. ’हे सरकार सर्वमान्य नाही, त्यांना उखडून टाकण्यासाठीच परिवर्तनाची गरच आहे,’ असे ते म्हणाले. शिवसेना एकीकडे विरोध करते, दुसरीकडे सत्ता भोगते. भाजपने शिवसेनेची धार घालवली आहे. युती गेली खड्ड्यात असे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणतात. त्यांचे हे म्हणणे जनता खरे करून दाखवेल व युतीला खड्ड्यात घालेल,’ असा टोला मुंडे यांनी लगावला. 


दिवसा शिव्या, रात्री नाक घासणे

जयंत पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला केला. ते म्हणाले, की भाजपच्या विरोधात दुपारी शिव्या घालायच्या आणि नाक घासत रात्री मुख्यमंत्र्यांना भेटायचे, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. ठाकरे यांनी दुपारी मोदींविरोधात भाषण केले आणि रात्री सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर नाक घासत गेले,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 


आता मित्रही म्हणतोय चौकीदार चोर है!
छगन भुजबळ यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, की आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून ’चौकीदारही चोर है’ अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर पंढरपूरला झालेल्या सभेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्याच घोषणेचा उच्चार करत मोदींना धारेवर धरले. त्याचा दाखला देत आता भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे.