Breaking News

कडाख्याच्या थंडीतही मोर्चे व उपोषणाने गाजला दिवस केमिस्ट व सीटू कामगार संघटनेचा मोर्चा, ग्रामरोजगार सेवकांचे उपोषण


बुलडाणा,(प्रतिनिधी): आपल्या विविध मागण्यासाठी कडाख्याच्या थंडीतही आज मंगळवारी जिल्हा धिकारी कार्यालयावर दोन मोर्चे काढण्यात आले तर सध्या दोन उपोषण सुरू आहेतत्र यामध्ये केमीस्ट संघटना व सीटू कामगार संघटनेने मोर्चा काढला तर ग्रामरोजगार सेवक संघटनेचे उपोषण सुरू आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संपुर्ण भारतातील औषध विक्रेत्यांच्या वतीने 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

ऑनलाईन औषधी ही समाजाच्या हिताची नसून त्यामुळे होणारे दुरूपयोग टाळण्याच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेने जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासन कार्यालयात मुक मोर्चाद्वारे निवेदन सादर केले. ऑनलाईन औषधीसाठी केंद्र सरकार अनुमानीत प्रस्तावित ड्रॉप्ट घेऊन येत आहे. त्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने कित्येक आंदोलने केलीत. त्यामध्ये तीनवेळा भारत बंद, मुक मोर्चा, ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले. परंतु आजपर्यत त्या विषयी सरकार गंभीर दिसून येत नाही. चेन्नई, दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषधी विक्री बंद करावी असा आदेश दिला होता. परंतु सरकार गांभीर्याने विचार करीत नाही. प्रस्तावित अधिसूचनेचा मसुदा यामध्ये संघटनेचे मत सुद्धा जाणून घ्यावे. जेणेकरून समाज हिताकडे दुर्लक्ष होणार नाही. प्रस्तावित अधिसुचनेचा मसुदा रद्द करण्यासाठी अनिल नावंदर यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नहार, जिल्हा सचिव गजानन शिंदे, उपाध्यक्ष प्रेमचंद जैन, शेख इरफान, विजय एंडोले, प्रशांत ढोरे पाटील, गणेश बंगळे, शरद सपकाळ, महेश चाकणकर, रविंद्र वडते, सुनिल पारस्कर, संदीप तायडे, गजानन घनोकार, गजानन दिवटे, जैस्वाल, रामचंद्र आयलाणी, दिवाकर पाटील, पंकज मोहीते, संतोष जैन, नितीन आढाव, दशरथ हुडेकर, सुभाष पाटील, सुरेश चव्हाण, स्वप्निल तायडे, जितेंद्र कोचर, धर्मेश कमाणी, जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. सीटू कामगार संघटनेचा मोर्चा दरम्यान सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स-गटप्रवर्तक संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा गांधी भवन, जयस्तंभ चौकातून संगम चौक, क्रीडा संकुल, शिवालय, बसवेश्‍वर चौक, अण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

या ठिकाणी मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. या वेळी आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार आणि एमएसएमआरए संघटनेच्या वैद्यकीय प्रतिनिधींचा मोठा सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केल्यानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्यामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मागण्यांचे निवेदन पाठविले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना कायम सेवेत घेऊन त्यांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधीसह सामाजिक सुरक्षा लागू करा, आशा वर्कर्सना 10 हजार तसेच गटप्रवर्तकांना 18 हजार रुपये मानधन लागू करा, शालेय पोषण आहार योजनेमध्ये भरीव तरतूद करून यामध्ये काम करणार्या कामगारांना किमान वेतन द्या, तसेच त्यांना कायम सेवेत घ्या, सर्व असंघटित कामगारांना किमान वेतनासह सामाजिक सुरक्षा, विमा सुरक्षा लागू करा, भारतीय कामगार परिषदेच्या शिफारसींची अंमलबजावणी करा, वाढत्या महागाईवर लगाम लावा, कामगार कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, वैद्यकीय प्रतिनिधींना किमान वेतन 20 हजार रुपये करा, औषधी व वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी रद्द करा, एसपीई अ‍ॅक्ट अंतर्गत वैद्यकीय प्रतिनिधींच्या दैनंदिन कामाचे नियमन करा, सर्व असंघटित कामगारांना पेन्शन व सामाजीक सुरक्षा लागू करावी यासह विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.