Breaking News

परभणीतील युवकाची मेढ्यात आत्महत्त्या


मेढा, (प्रतिनिधी) : येथील मोहाट पुलावरून येथील फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्याने वेण्णा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने मेढा परिसरात एकच खळबळ उडाली. मूळचा परभणी येथील राहिवासी असलेला हा विद्यार्थी नदीपात्रात खोल बुुडाल्याने स्थानिक नागरिकांसह महाबळेश्‍वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांकडून त्याची शोध मोहीम काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर आज पुण्याहून एनडीआरएफची टीम त्याच्या शोधासाठी दाखल झाली होती.

मेढ्यातील वेण्णा नदीमध्ये पुलावरून उडी घेऊन नकुल बालाजी दुबे या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो नदीच्या खोल पाण्यामध्ये बुडाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेला हा विद्यार्थी मित्रांसमवेत वेण्णा नदीवर आला होता, अशी माहिती त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांकडून समजली. कॉलेजमध्ये दुपारी जेवणाची सुट्टी झाली असताना आपल्या मित्रांसमवेत नकुल वेण्णा नदीच्या पुलावर मित्रांसमवेत गेला. त्यावेळी अचानक मित्राच्या हातात चिठ्ठी देऊन त्याने पुलावरून वेण्णा नदीत उडी मारली. उडी घेतल्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला असून अद्याप त्याचा शोध लागला नाही. 

नकुल दुबे हा परभणीचा राहणारा असून मेढा येथील फार्मसी कॉलेजमध्ये तो दुसर्‍या वर्षाला शिकत आहे. पुलावरून उडी घेतल्यानंतर पुलावर बघ्यांची तसेच त्याच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्याच्या मित्रानेही या घटनेचा धसका घेतला आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. घटनास्थळी मेढा पोलिस पोहोचले असून त्यांनी बुडालेल्या विद्यार्थ्याच्या शोधासाठी महाबळेश्‍वर व सह्याद्री ट्रेकर्सना पाचारण केले. ट्रेकर्सकडून रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरु होते.