Breaking News

श्रम-संस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू : सासणे


कराड (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने येथील डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस व डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने सुर्ली येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा नुकताच प्रारंभ झाला. 

शिबिराचे उदघाटन कोल्हापूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांच्या हस्ते, तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भीमराव ढमाले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ, सरपंच सौ. सुवर्णा पांडुरंग जाधव, उपसरपंच कृष्णत मल्हारी मदने प्राचार्या डॉ. अन्वर मुल्ला, सौ. निता उत्तमराव वेताळ, रवींद्र माने, प्रा. प्रकाश चोरगे, विजय खापे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

उदघाटनपर भाषणात मेजर सुभाष सासणे म्हणाले, श्रम व संस्कार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जर परिश्रम घेतले तर काम शंभर टक्के होतेच पण, आरोग्यसुध्दा चांगले राहण्यास श्रमामुळे मदत होते. म्हणून प्रत्येकाने कठोर परिश्रम हे केलेच पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही तुमची प्रगती करू शकणार नाही. कार्यक्रम अधिकारी प्रा. अयुब कच्छी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, या शिबिरात ग्रामस्वच्छता, ग्राम सर्वेक्षण, रस्ता दुरूस्ती, बंधारा बांधणे या श्रमदानाबरोबर वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, एडस् प्रबोधन व अंधश्रध्दा निर्मूलन याविषयी जनजागृती तसेच दररोज सायंकाळी प्रबोधनात्मक व्याख्याने होतील. त्यामध्ये प्राचार्य सतिश घाटगे, प्रा. जीवन पवार, महेंद्र भोसले, प्रा. महेंद्र कदम-पाटील, प्रा. ऋतुजा जगताप, प्रा. पोपटराव शेवाळे या व्याख्यात्यांचा समावेश आहे.