Breaking News

अग्रलेख - भाजपची कोंडी


देशात आगामी लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशा निवडणूकांच्या वातावरणातच भाजपाचे डोंबिवलीतील भाजपाचे पदाधिकारी, धनजंय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेषत: धनजंय कुलकणी हे भाजपाचे जसे पदाधिकारी आहेत, तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील आहेत. धनजंय कुलकर्णी फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली दुकान थाटून खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री करत होता. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे.पोलिसांनी अचानकपणे धाड टाकून या दुकानातून तब्बल 170 प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांनी एयरगन,10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍या असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. भाजपाचे पदाधिकार्‍यांकडे एवढया मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्यामुळे विविध प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. आगामी निवडणूकां डोळयासमोर ठेवून राज्यात दंगली घडवायच्या होत्या का? कोणता कट शिजत होता? यासारखे अनेक प्रश्‍न या शस्त्रसाठयामुळे उपस्थित होत आहे. पोलिस तपासात या प्रश्‍नांची उत्तरे समोर येतील यात शंकाच नाही. राज्यातच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाधी धर्मांध शक्तीकडे असे शस्त्रसाठे आढळले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस तपास करत असतांनाच पोलिसांनी नालासोपारा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथील वैभव राऊत याच्या राहत्या घरी कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब आणि जवळपास 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करून घातपाताच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सनातन आणि शिवप्रतिष्ठाणशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली होती. वैभव राऊत याच्या अटकेनंतर राज्यभरात ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला अनेक ठिकाणी धाडी टाकत धर्मांध तथाकथित संघटनेचे अनेक कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र वैभव राऊतने ही स्फोटके का आणि कशी जमा केली? कोणत्या कटासाठी ही सामग्री जमा केली. या प्रश्‍नांची उत्तरे तब्बल पाच महिन्यानंतर देखील मिळालेली नाही. गेल्या चार वर्षांत राज्यात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आले आहेत. मात्र पुढे याप्रकरणांचा तपास कुठपर्यंत आला, याबाबत साशंकता आहे. धनंजय कुलकणी हा भाजपाचा पदाधिकारी एवढया मोठया प्रमाणात शस्त्रसाठा कशासाठी जवळ बाळगत होता. फॅशनेबल दुकांनाच्या आडून तो हा शस्त्रसाठा आपल्या कोणत्या मित्रांपर्यंत पोहचवत होता. हा शस्त्रासाठा त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहचवून त्यांना कुणाच्या हत्या करायच्या होत्या. की आगामी निवडणूका डोळयांसमोर ठेऊन दंगली घडवायच्या होत्या. यासारखी अनेक प्रश्‍ने यानिमित्ताने समोर येत आहे.

यापूर्वी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असलेल्या शस्त्रसाठयाचा उल्लेख केला होता. विजयादशमी च्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत एके-47 रायफल सह अनेक शस्त्रास्त्राची पुजा करतात. त्यामुळे भागवतांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली होती. आपल्या देशातील कायद्यानुसार कोणालाही विनापरवाना शस्त्र बाळगता येत नाही आणि चक्क एके 47 रायफल सापडल्यामुळे तर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकरांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले होते. आपल्या देशात परवानगी घेऊन पिस्तूल वापरता येते पण देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक हत्यारं संघाकडे कशी? तसेच देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायुदल असताना संघाणे प्रतिसेना का उभा करावी? असे प्रश्‍न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले होते. संघाच्या लोकांकडे शास्त्रात्रं सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत.यांच्यावर नागपुरात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी पुढील कारवाईने कोणताही वेग घेतला नाही. त्यामुळे धनजंय कुणकर्णी यांच्याकडे सापडलेल्या शस्त्रसाठया प्रकरणी काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धनजंय कुणकर्णी याला ‘या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे’ अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसकडून करण्यात आली आहे.‘भाजपाचे पदाधिकारीच जर अशाप्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँगे्रसने भाजपावर टीका केली आहे. राज्यात गेल्या चार-साडेचार वर्षांत ज्या ठिकाणी शस्त्रसाठा सापडला आहे, त्या त्या वेळेस धर्मांध राजकीय संघटनांची नावे समोर आली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणज्ञी ‘सनातन प्रभात’चे माजी संपादक शशिकांत राणे यांचे नाव समोर आले आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. गौरी लंकेश प्रकरणात आरोपी अमित देगवेकर याच्या जबाबवरून राणे यांचे नाव उघड झालं आहे. काका नावाने राणे यांना ओळखलं जायचंस असं अमितने चौकशीत कबूल केले आहे. सनातनच्या माजी संपादकाचे नाव समोर आल्यामुळे दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशया चारही हत्यांमध्ये पुन्हा एकदा संशयाची सुई सनातन संस्थेवर आली आहे. सनातन या संस्थेनंतर आता भाजपाचा पदाधिकार्‍यांच्या दुकानातच शस्त्रसाठा मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.