Breaking News

भाजपची युज अँड थ्रो पॉलिसी खपवून घेणार नाही : अशोकबापू गायकवाड


कराड, (प्रतिनिधी) : निवडणुकीपुरते गोड गोड बोलून जवळ करायचं आणि काम संपल्यावर बाजूला करायचं ही भाजपची युज अँड थ्रो पॉलिसी यापुढे आरपीआय खपवून घेणार नाही. मलकापूर नगरपालिका निवडणुकीत मागास प्रवर्गातील दोन जागांवर आमच्या पक्षातील उमेदवारांना संधी न दिल्यास स्वतंत्र विचार करू, असा गर्भित इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत दिला.
मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील विश्रामगृहात अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाल्या पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. त्या वेळी युवराज काटरे, नितीन आवळे आदींसह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सध्या मलकापूर नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात भाजपने आरपीआयच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगून अशोक गायकवाड म्हणाले, महाआघाडीचा घटक पक्ष म्हणून आरपीआय ज्या पद्धतीने भाजपला सत्तेत आणण्यासाठी मदत करू शकतो, त्याच पद्धतीने स्वतः निवडून नाही आलो, तरी अन्य पक्षाच्या उमेदवारांना मात्र नक्कीच पाडू शकतो. 
श्री. गायकवाड म्हणाले, महाआघाडीचा घटक पक्ष म्हणून मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी आरपीआयच्या मागणीनुसार आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारी देणे गरजेचे होते तशी आमची मागणी ही भाजप नेत्यांकडे होती आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. भाजप आरपीआयचे उमेदवार असलेल्या ठिकाणी स्वतःचे मागास प्रवर्गातील कार्यकर्ते उभे करून त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म वितरित केले आहेत.