सातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन


मुंबईतील जसलोक रूग्णालात घेतला अखेरचा श्‍वास : शुक्रवारी बोपेगावमध्ये अंत्यसंस्कार

सातारा (प्रतिनिधी) : सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पांडुरंग जाधव पाटील (वय 80) यांचे दीर्घ आजाराने मुंबईतील जसलोक रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुमनताई, सुपूत्र आमदार मकरंदआबा पाटील यांच्यासह तीन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

लक्ष्मणराव पाटील यांचे पार्थिव आज गुरूवार, दि. 17 रोजी दुपारी चार वाजता सातार्‍यात विकासनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रवादी भवन, जिल्हा परिषद आदी ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (शुक्रवार) सकाळी दहा वाजता बोपेगाव (ता. वाई) येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पाटील कुटूंबियांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.

बोपेगावच्या सरपंचपदापासून लोकसभेच्या सदस्यत्त्वापर्यंत सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी विविध मानाची पदेे भूषविली होती. सलग 13 वर्षे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर सन 1999 मध्ये त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास ठेवत जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीत प्रवेश केला व पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात पक्षाची वाढ केली. 

यापूर्वी वाईच्या जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना चेअरमन, सातारा दूध संघ आदी संस्थांचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले. जिल्ह्याच्या राजकारणातील एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांच्या निधनाने समाजकारण, राजकारणातील एक जाणता नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget