Breaking News

सामूहिक वंदे मातरम् निर्णय कमलनाथ सरकारकडून रद्द


भोपाळः मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने भाजपला धक्के देण्यास सुरू केले आहे. शिवराज सरकारने आपल्या काळात मंत्रालयाबाहेर सामूहिक वंदे मातरम् गाण्याचा निर्णय घेतला होता; मात्र मुख्यमंत्री कमलनाथ सरकारने हा निर्णय आता रद्द केला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांच्या काळात भोपाळमध्ये असलेल्या मंत्रालयाबाहेर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्यात आले होते. कमलनाथ सरकारने ’जनतेचे आधी काम करा’, असा संदेश देत हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आज 1 जानेवारीला पहिल्या दिवशी मंत्रालयाबाहेर वंदे मातरम् गायले गेले नाही. कमलनाथ यांच्या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते उमा शंकर गुप्ता यांनी कमलनाथ सरकारवर टीका केली आहे. वंदे मातरम् म्हणत स्वातंत्र्याची लढाई लढण्यात आली होती; पण काँग्रेसने असा निर्णय घेऊन त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. काँग्रेसने राजकीय द्वेषातून हा निर्णय घेऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे, अशा शब्दांत उमा गुप्तांनी कमलनाथ सरकारवर टीका केली.