Breaking News

अखेर ‘बेस्ट’चा संप नवव्या दिवशी मागे

Image result for ‘बेस्ट’मुंबई : नऊ दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. अखेर बुधवारी बेस्ट कर्मचारी संघटनेने संप मागे घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तसेच संप मागे घेण्याची घोषणा एक तासाच्या आत करावी, असेही न्यायालयाने म्हटले होते, यानंतर शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. बेस्ट कर्मचारी संघटनेने संप मागे घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कर्मचारी व्यवस्थापनाने दहा टप्प्यात पगारवाढीचे आश्‍वासन दिले आहे. हे कर्मचारी संघटनेने मान्य केले आहे. गेल्या 8 जानेवारीपासून 32 हजार बेस्ट कामगार संपावर गेले आहेत. बेस्टच्या 3700 बसेस जागीच उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत न्यायालय म्हणाले की, तुमचे वागणे योग्य नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीला फाटे फोडाल तर काहीच होणार नाही. काल 10 टप्प्यांवर पगारवाढीला सहमत होता, मग आज 15 टप्प्यांवर का आलात, असे उच्च न्यायालयाने आंदोलकांना फटकारले. तसेच प्रशासनाने काय करावे हे युनियन कसे सांगू शकते. उद्या प्रशासन जे बोलेल ते तुम्ही ऐकाल का? असा प्रश्‍न न्यायालयाने संपकर्त्यांना विचारला आहे. उच्चस्तरीय समितीच्या फक्त 2 शिफारशी फायद्याच्या अन्य मुद्य्यांवर विरोध होत आहे. बेस्टची वाटचाल खासगीकरणाकडे होत आहे हे चुकीचे आहे, असे कृती समीतीने म्हणणे मांडले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावनीदरम्यान कृती समितीच्या वकिलांकडून कामगारांच्या मागण्यांबद्दल माहिती देण्यात आली. यापूर्वी उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीबरोबर 3 बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीत संपावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत चर्चा झालेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत असल्याचे वकीलांनी सांगितले आहे. बेस्ट कर्मचार्‍यांची पगारवाढ फेब्रुवारी 2019 पासून देण्यात येईल. मात्र, कुठल्याही एरियस विना ही पगारवाढ देण्यात येईल, असे बेस्टने म्हटले आहे.