Breaking News

पुणे-बेंगलोर महामार्गावरील ‘एस’ आकाराच्या वळणावर अपघातात एक ठार; तीन जखमी


खंडाळा (प्रतिनिधी) : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणार्‍या धोकादायक एस वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. 

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेला कंटेनर (एमएच 15 इजी 9612) हा खंबाटकी घाटाचा बोगदा ओलांडल्यावर भरधाव वेगाने एस वळणावरून निघाला होतहा. त्याच्या पुढे धान्य कोठी घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरला (एमएच 11 बीए 7719) ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकने ट्रॅक्टरला सुमारे 100 फूट रेटत नेले. यादरम्यान पूलाच्या कठड्याला धडकून कंटेनर पलटी झाला तर ट्रॅक्टरचा चुराडा झाला. हा अपघात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात ट्रॅक्टर चालक अशोक शामराव जाधव (वय 39, रा. बोपेगाव, ता. वाई) यांचा जागीच मृत्यू झाला तर बाळासाहेब जाधव (वय 42, रा. पांडे, ता. वाई) कंटेनर चालक, संदीप सुभाष निर्भवणे (वय 27), अमोल काशीनाथ वाघ (वय 24, दोघेही रा. शिवरे, ता. निफाड, जि. नाशिक) हे तीघेजण जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळास भेट देवून जखमींना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि हणमंत गायकवाड करत आहेत.