वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या’ माध्यमातून काम करावे : राज्यपाल


मुंबई : वंचित घटकांच्या विकासासाठी आता ‘सीएसआर’ पाठोपाठ ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या (आयएसआर) माध्यमातून सहभाग नोंदविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

किंग जॉर्ज व्ही मेमोरियल आंनद निकेतनच्या 81 व्या स्थापना दिवस समारंभात राव बोलत होते. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल,किंग जॉर्ज व्ही मेमोरियल धर्मादाय विश्‍वस्त संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस, मानद सचिव वंदना उबेरॉय, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रॉनी मेंडोन्सा आदी उपस्थित होते. आनंद निकेतनने शेकडो वंचित, दिव्यांग, गंभीर आजारी, वृद्ध, अनाथ तसेच समाजातील अन्य घटकांना आसरा देण्यासह काळजी घेतली आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, बाल आशा ट्रस्ट, वत्सालय फाऊंडेशन, ऑर्ड, नॅशनल एसोसिएशन फॉर द ब्लाइंड, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आदी नामांकित संस्था दिव्यांग, अंध, अनाथ, रस्त्यावरील मुले, गतिमंद, कर्णबधीर, मूकबधीर, कर्करोग रुग्ण, गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिक आदींना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास मदत करत आहे.

राज्यपाल म्हणाले, केंद्र शासन, राज्य शासन तसेच स्वयंसेवी संस्था विविध वंचित घटकांसाठी काम करत आहे. मात्र समाजातील प्रत्येकानेच योगदान देण्याची गरज आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आज गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारी नागरिकांची काळजी घेण्यावर मर्यादा येत आहेत. अशा सदस्यांना समाजप्रवाहात घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एका बाजूला 2020 पर्यंत भारतीयांचे सरासरी वय 29 वर्षे असेल. तर दुसर्‍या बाजूला 2050पर्यंत देशात 34 कोटी वृद्ध लोक म्हणजेच अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वृद्ध लोक असतील असा अंदाज आहे.
मुले देशाच्या भविष्यातील नागरिक आहेत. शाळा आणि महाविद्यालये आणि आनंद निकेतनसारख्या संस्थांमध्ये सतत संवादाची गरज आहे. अशा संस्थांना विद्यार्थ्यांना भेटी दिल्यास त्यांच्यामध्ये समाजाच्या मोठ्या समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण होईल. आनंद निकेतन आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी विविध प्रकल्पांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींची क्षमता बांधणी केल्यास त्यांचे काम अधिक सूत्रबद्ध होईल, असेही राव म्हणाले. प्रास्ताविकास बोर्जेस यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, संस्थेकडून तसेच अन्य इतर संस्थांच्या सहयोगातून दिव्यांग, अंध,अनाथ, रस्त्यावरील मुले, गतिमंद, कर्णबधीर, मूकबधीर, कर्करोग रुग्ण, गरीब घटक आदी वंचितांतील वंचित घटकांसाठी काम केले जाते. भविष्यात गंभीर कर्करोग रुग्णांसाठी सुश्रुषा केंद्र सुरू करण्याचा विचार संस्थेचा आहे. यावेळी बाल आशा ट्रस्ट, नॅब, वत्सालयातील युवक आणि मुलांनी सुंदर नृत्य सादर केले. संस्थेच्या कार्याविषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. राज्यपालांचे स्वागत संस्थेत राहून उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्मृतीचिन्ह देऊन केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget