Breaking News

गिरणी कामगार घराच्या प्रश्‍नावर लवकरच तोडगा; म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची ग्वाह


मुंबई (प्रतिनिधी) : पनवेल येथील बांधून तयार असलेल्या एमएमआरडीएच्या एकूण आठ हजार घरापैकी 2268 घरांची सोडत काढण्याबाबत म्हाडाने तयारी केली आहे. परंतू काही कामगार संघटना या विरोधात न्यायालयात गेल्याने सोडत काढण्यास विलंब होत आहे. याबाबत योग्य ते पाऊल उचलून कामगारांना लवकरात लवकर घरे मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी कामगार संघटना नेत्यांच्या बैठकीत दिली.

मुंबईतील 7 गिरण्यांची कट ऑफ डेट (तारीख) निश्‍चित करणे आणि इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी राज्य शासनाचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलवली होती. बैठकीला गिरणी कामगार कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर-पांडे, जयप्रकाश भिलारे, बबन गावडे, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, प्रवीण घाग, नंदू पारकर उपस्थित होते. बैठकीला गृहनिर्माणचे संजयकुमार, नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीत, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, कामगार आयुक्तालयाचे मुख्यधिकारी जाधव व तसेच एमएमआरडीए आणि अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत फॉर्म भरलेले प्रकाश कॉटन, श्रीनिवास, मधूसुदन, हिंदूस्थान ए/बी, क्राऊन, हिंदुस्थान प्रोसेस, स्टँडर्ड मिल शिवडी, स्टँडर्ड मिल प्रभादेवी या गिरण्यांचे कामगार आधीच संपावर गेल्याने त्याच्यासाठी 1/10/1981 ही कट ऑफ डेट (तारीख) असावी. या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. सन 1982 च्या संपापूर्वीची 6 गिरण्यांतील कामगारांची कायदेशीर देणी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने न दिल्यामुळे कामगार आयुक्तांच्या कार्यलयाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नव्हते. परिणामी कामगारांच्या घरांसाठी 1/3 जमिनीच्या हिस्सा मिळण्यास अडचण येत होती. तथापि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी 1/3 जमिनी मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र शिथिल करण्यात यावे. अशी मागणी आधी कामगार आयुक्तांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत केली होती. याबाबतची माहिती रा. मि. म. संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिली. त्यासंदर्भात एनटीसी व्यवस्थापनाशी चर्चा करून वरील कायदेशीर देणी देण्याबाबत प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे दिनेशकुमार जैन यांनी कामगार नेत्यांच्या बैठकीत सांगितले.
एमएमआरडीएने ठाणे व रायगड जिल्ह्यातील गावठाण विभागात गिरणी कामगारांसाठी घरे बांधून देण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेत्यांनी जमिनी दाखविल्या होत्या. त्या जमिनीवर तातडीने घरे एमएमआरडीएने बांधावीत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.