Breaking News

सडकसख्याहारींना कराडात अटक


कराड (प्रतिनिधी) : विद्यानगर - सैदापूर (ता. कराड) येथील कॅनॉल परिसरात मुलींची छेडछाड करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार पिडीत मुलीने केल्यावरून कराडमध्ये तिघा सडकसख्याहारींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. कार्तिक किशोर नाईक (वय 21), सोन्या संभाजी नाईक (दोघेही रा. सैदापूर, ता. कराड), समीर शरिफ बेग (वय 18 रा. ओगलेवाडी, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी पाच वाजता फिर्यादी युवती कॉलेज सुटल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत घरी पायी जात असताना कॅनॉल परिसरात तिन्ही संशयितांनी त्या मुलींचा पाठलाग केला. तसेच फिर्यादी मुलीच्या मैत्रिणीस तुझा नंबर दे, तू मला आवडतेस, असे म्हणून अश्शिल शेरेबाजी करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून बलात्कार करण्याची धमकी दिली. फिर्यादी युवतीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मंगळवारी सकाळी फिर्यादी आपल्या वडिलांसमवेत कॉलेजला आल्यानंतर त्याठिकाणी कार्तिक नाईक, सोन्या नाईक, समीर बेग यांनी कॉलेज परिसरात येऊन त्या मुलींकडे पाहत असताना फिर्यादीने आपल्या वडिलांना काल त्रास देणारे तिन्ही संशयित हेच असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी सदरची घटना तेथे बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांना सांगितली. त्यावरून फिर्याद दाखल करून घेत पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले.