Breaking News

बीडच्या आडत मार्केटमध्ये धिंगाना


बीड, (प्रतिनिधी):- खासबागजवळील आडत मार्केटमध्ये येऊन दादागिरी करत शेतमाल उचलण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला तेथील बागवान आणि शेतकर्‍यांनी जाब विचारल्यामुळे त्यांनी तुफान दगडफेक करुन बागवान व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल बागवान समाजातील काही युवकांनीही गुंडांच्या दिशेने दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी दंगल नियंत्रक पथकासह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्याने आणि त्यांनी जमावाला पांगवल्याने तणाव निवळला. दरम्यान यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये बागवान समाजातील व्यापार्‍यांसह शेतकरी आणि महिलांचाही समावेश आहे. 


बीड शहरातील खासबाग जवळील आडतमार्केटमध्ये आज सकाळी वाद झाला. मार्केटमध्ये येऊन नेहमीच त्रास देणार्‍या काही तरुणांपैकी एकाने येऊन शेतकर्‍याने आडत्यासमोर माप काट्यासाठी टाकलेल्या हरभर्‍यापैकी बराच हरभरा जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकर्‍यासह तेथील बागवानेनेही याबाबत जाब विचारला असता त्याने अरेरावी करुन शिवीगाळ केली. सदरील प्रकारानंतर त्या तरुणाला काही जणांनी पकडताच त्याने गल्लीतील इतर तरुणांना बोलावून घेतले. त्यानंतर वाद वाढला बागवान व्यापारी, शेतकरी आणि आडत मार्केटमध्ये येऊन त्रास देणार्‍यांचा गट समोरासमोर आल्याने दगडफेकीला सुरुवात झाली. काही वेळातच दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती कळताच बीड शहर पोलिस ठाण्याचे सपोनि.पगार यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र त्यानंतरही दोन्ही गट आक्रमकपणे एकमेकांवर धावून येऊन लागल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनीही दंगल नियंत्रक पथकासह घटनास्थळी येऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. 

सभापती मुखीदलाला, नगरसेवक फारुख पटेल, ऍड.शेख शफिक भाऊ, इरफान बागवान आदिंनीही त्याठिकाणी येऊन शांततेचे आवाहन केले. दरम्यान यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये हाजी हाशम बागवान, हाजी हरुण बागवान, पापा चौधरी, खलील बागवान यांच्यासह शेतकरी महिला जनाबाई, शिंगणबाई यांच्यासह अन्य चौघेजण जखमी झाले आहेत तर दुसर्‍या गटातील स्थानिक नागरिकांनाही किरकोळ मार लागला असुन त्यांची नावे मात्र समजू शकली नाही. या प्रकरणात दोन्ही गट पोलिस ठाण्यात आले असुन आडत मार्केटच्यावतीने हाजी हाशम यांनी पोलिसात तिघांविरुद्ध तक्रार दिली असुन दुसर्‍या गटानेही बागवानांविरुद्ध तक्रार दिली आहे. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान त्या भागातील तरुण नेहमीच आडत मार्केटमधील लोकांना त्रास देतात. रात्री-अपरात्री फेन्सिडीन घेऊन नशा करणे, गोळ्या खाणे आणि त्यानंतर आडत मार्केटमध्ये घुसून गोंधळ घालणे असे प्रकार नेहमीच घडत आहेत. मार्केट सुरु झाल्यानंतर शेळ्या, म्हशी सोडणे असे प्रकारही वाढले होते. या प्रकरणात व्यापार्‍यांनी यापुर्वी पोलिसात तक्रारही केली होती.