Breaking News

नगरचा राजकीय संग्राम संपेना

राजकीय अराजकता, पक्षांमधील मतभेद, आरोप-प्रत्यारोप, नगरकर झाले हैराण

ncp shiv sena साठी इमेज परिणाम


अहमदनगर/प्रतिनिधी
राज्यात अहमदनगर हे विकास सोडून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. गुन्हेगारीत दुसर्‍या तर अपघातात तिसर्‍या क्रमांकावर आहे. इतकेच काय, राज्यातील राजकीय गुन्हेगारी देखील ठळक अक्षरांनी रेखाटली जावी अशी आहे. कोपर्डी, सोनई, केडगाव, जामखेड, शेतकरी अंदोलन, गोळीबार, गावठी कट्टा, दरोडेखोरी अशा विविध बाबींनी नगर कुख्यात आहे. मात्र, आता त्या पाठोपाठ राजकीय रणसंग्रामाचे ग्रहाण नगरला लागले आहे. ते संपण्याचे चिन्ह दुरदुरवर दिसत नाही. त्यामुळे सद्यातरी शहरात राजकीय अराजकता माजल्याचे पाहवयास मिळत आहे.

महापालिकेची निवडणूक झाली आणि भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्या मनातील खरी खदखद बाहेर पडली. सत्ता स्थापनेसाठी व राजकीय कुच्चामोड करण्यासाठी वाट्टेल ते. अशी धारणा मनात धरुन प्रत्येकाने नवा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत शिवद्रोही छिंदम म्हणणार्‍यांनी त्याच्याकडे मतासाठी हात पसरविले, केडगावात शिवसेनेच्या पादाधिकार्‍यांना मारणार्‍या राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी शिवसेनेने छुपी साद घातली. मात्र, भाजपचा इंगा मोडण्यासाठी जसे गणिमी कावे शिवसेनेच्या मनात खदखदत होते. तसेच सेनेच्या जबड्यात हात घालून दात पाडून दाखवायची धाडस राष्ट्रवादी व भाजपच्या मनात शिजत होती. म्हणून राजकारणातील अंतर्गत रणसंग्राम वेळ आल्यानंतर जनतेच्या समोर आला. तत्पुर्वी मात्र, भोळीभाबडी जनता राजकारण्यांच्या डावपेचासमोर अनभिज्ञ होती.

आता मनपात भाजपला हात देऊन राष्ट्रवादीने शिवसेनेला पायचित केले. यात भाजपचे फावले. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील वाद भाजप निच्छिंत पाहत बसली आहे. दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ. या म्हणीचा खरा प्रत्येय नगरमध्ये सद्या पहावयास मिळतो आहे. प्रा. शिंदे पालकमंत्री एटीत फिरत आहे. खा. गांधी त्यांच्या भविष्यकाळाची तयारी करीत आहेत. महापौर महोदय दिल्ली दौर्‍यावर गेले आहे. आणि दुसरीकडे उपनेते अनिल राठोड यांची पत्रकार परिषद झाली की, आ. संग्राम जगताप हे माध्यमांना निमंत्रीत करतात. दोन्ही पक्षांनी चांगल्या जागा घेऊनही ना घर का, ना घाट का. अशी परिस्थिती झाल्याचे दिसते आहे.
राष्ट्रवादीने तीनशे कोटीच्या विकासाला हात दिला की केडगाव हत्याकांडातून बाहेर पडण्यासाठी, पैशांसाठी की, शिवसेनेचा कुच्चामोड करण्यासाठी यांची अनेक कारणे आता उघडउघड दिसत आहे. मात्र, आ. संग्राम जगताप यांनी या युतीला सर्वस्वी स्वत:च्या अंगावर घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दुर रहावे लागले. म्हणून त्यांना बेचेन झाल्याचे आरोप होत आहे. याच कारणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे प्याव आणखी उमलत चालले आहे. मात्र, हा हेव्यादाव्यांचा व सुडबुद्धीचा रणसंग्राम थांबला पाहीजे. हीच नगरकरांची इच्छा आहे. अन्यथा शहरात येणारा काळ खूप भयानक असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

अन्यथा पुन्हा रक्तपात पाहवयास मिळेल
नगरचे हे राजकीय वातावरण कोठेतरी शांत होणे आवश्यक आहे. हे असेल चालु राहीले तर, पुन्हा शहरात अराजकता माजेल. नेत्यांच्या प्रक्षोभीत वक्तव्याने कार्यकर्ते खवळून निघतात. पक्षात मानाचे स्थान मिळावे, नेत्याच्या नजरेत भरावे यासाठी शसस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबविण्याचा प्रयत्न करतात. आणि अनावधानाने घडते. केडगाव हत्याकांड. म्हणून समजदार नेत्यांनीच हे वातावरण शांत करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा रक्तपात पहावयास मिळेल यात शंका नाही. असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.


माध्यमे व सामाजिक संघटनांची भूमिका...
लोकशाही व समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक संघटना व माध्यमांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. अभ्यासू घटकांनी अशा राजकीय अराजकतेवर लिहीले पाहीजे. तर ज्येष्ठ समाजसेवकांनी खवळलेल्या लोकप्रतिनिधिंना शांत करणे आवश्यक आहे. कारण, दंगल, हल्ले, खून, मारामार्‍या, धक्काबुकी, लाठीचार्ज, जीवघेणे प्रकार अशा गोष्टींमध्ये नेते मागे असतात. यात बळी जातो तो सामान्य कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांचा. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर माध्यमांनी व समाजसेवकांनी नगरच्या राजकारणाला गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.