Breaking News

अग्रलेख - संयत निषेध


साहित्यबाह्य विषयांवरून साहित्य संमेलनं गाजण्याची परंपरा या साहित्यसंमेलनात ही कायम राहिली. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावणं आणि त्यानंतर त्यांचं निमंत्रण अचानक रद्द करणं हे अनुचितच होतं. त्यावर साहित्यिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया येणं ही स्वाभावीकच होतं; परंतु साहित्य संमेलनावर अध्यक्षांसह स र्वांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका आततायी होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची पद्धत सुरू झाल्यानंतरचं हे पहिलचं साहित्य संमेलन. ज्यांच्या घरात साहित्यिक वारसा आहे, त्या अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली. त्यांच्या भाषणाचं साहित्यिक मूल्य काय, यावर चिंतन होण्याऐवजी सहगल यांच्या निमंत्रणाबाबत त्या काय भाष्य करणार, याकडं सारस्वतांचं लक्ष लागून राहावं, ही बाब खेदजनकच होती; परंतु ढेरे व माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत तांबोळी यांनी पुण्याहून यवतमाळला रवाना होण्यापूर्वीच आपल्या नयनतारा सहगल यांच्या अवमानाचा निषेध करण्याचे संकेत दिले होते. तांबोळी यांनी तर बडोदे येथे गेल्या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनात राजा चुकतो आहे, याची जाणीव करून दिली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणात झुंडशाही, असहिष्णुतेबद्दल उल्लेख येणार, याबाबत कुणाच्या ही मनात शंका नव्हती. ढेरे या संयमी. त्यांना दुर्गाताई भागवत यांचा रुद्रावतार घेणं शक्य नव्हतं. काहींनी त्यांना संमेलनाला जाऊच नका, एका महिलेचा अवमान होत असताना दुस-या महिलेनं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारावंच का, असे सल्ले आणि सवाल केले होते. यवतमाळमध्ये पूर्वी भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ग. दि. माडगूळकर यांनी भूषविलं होतं. आता त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षांत यवतमाळलाच भरलेल्या साहित्य संमेलनाला आपल्या अनुपस्थितीनं गालबोट लागणार नाही, उलट आपली ठाम मतं संयतपणे साहित्यिकांच्या आणि रसिकांच्या महामेळ्यात मांडता येतात, हे ढेरे यांनी दाखवून दिलं. आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळ उद्घाटन समारंभापूर्वी सहगल यांच्या अवमानाचं खापर परस्परांवर फोडून मोकळं होत होत्या. ढेरे यांनी मात्र नयनतारा सहगल यांचं निमंत्रण अनुचित पद्धतीनं रद्द करणं, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब होती. आयोजकांकडून ही गंभीर चूक घडल्याचं आम्हाला मान्य आहे. मराठी साहित्य संमेलन साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जातं आहे, हे आयोजकांनी वेळीच ओळखलं नाही. त्यानंतर साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशांपुढं आयोजकांनी नमतं घेतलं. ही गोष्ट आपल्याला शोभत नाही, अशा परखड शब्दांत आयोजकांना त्यांच्याच व्यासपीठावरून सुनावलं हे बरं झालं. वयाची नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल इतक्या दूर संमेलनाला येणार होत्या. त्यांना याठिकाणी मोकळेपणानं त्यांचे विचार मांडून द्यायला पाहिजे होते. हे विचार आपल्या विवेकबुद्धीनं स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं स्वातंत्र्य आपल्याला होतं; मात्र आपण या सगळ्याकडं त्यादृष्टीनं पाहू शकलो नाही. संमेलन ही भाबड्या वाचकांना भडकावण्याची जागा नव्हे. आपण भले सामान्य असू; पण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसं आहोत. त्यामुळं स्वत:च्या शक्तीवर विश्‍वास ठेवून असे प्रकार घडू न देणं, ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव अरुणा ढेरे यांनी साहित्यिक आणि वाचकांना करून दिली. 

लक्ष्मीकांत देशमुख प्रशासकीय अधिकारी होते, तरी त्यांची शेतक-यांशी नाळ कधीच तुटली नाही. मागच्या साहित्य संमेलनात राजा चुकतो आहे, असे सांगणारे देशमुख या वेळच्या वादात गप्प राहणं शक्यच नव्हतं. त्यांनी नयनतारा सहगल यांचं आमंत्रण मागं घेणं हे अनुचित आहे, हे आयोजकांना ठणकावून सांगितलं. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असतं, तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दांत घणाघात करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी आणि संयोजकांवरही टीकेचे आसूड ओढले. नयनतारा सहगल यांच्या साहित्य कर्तृत्वाला त्यांनी सलाम केला. नयनतारा सहगल प्रकरणानं महाराष्ट्राची मान खाली गेली आहे, असं सांगताना त्यांन निमंत्रण वापसीचा निषेध केला. साहित्य महामंडळानं सहगल यांचं भाषण वाचून दाखविण्याचं अमान्य केलं असलं, तरी देशमुख यांनी मात्र सहगल यांच्या नियोजित भाषणाचा एक उतारा वाचून दाखवला. भारतात जे काही वातावरण सध्या निर्माण झालं आहे, त्यामुळं साहित्यिक कलाकारांना बोलू दिलं जात नाही. त्यामुळं देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे, अशी घणाघाती टीका देशमुख यांनी केली. ढेरे यांनी आयोजकांची, तर देशमुख यांनी साहित्य महामंडळाची कानउघाडणी केली. आपण ज्या प्रांतात राहतो, त्या प्रांतातील घडामोडींचं चित्रण साहित्यात उमटलं पाहिजे. तेथील वेदना, दुःख, सल साहित्याचा भाग झाला पाहिजे. नेमकं याच वास्तवाला धरून देशमुख यांनी यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे, हे लक्षात आणून दिलं. केवळ आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या विधवा पत्नीच्या हस्ते उद्घाटन करून आपली जबाबदारी संपत नाही, तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव दिला पहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. कर्‍हाडच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी जसा आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता, तसाच आवाज समाजातल्या अन्यायाविरोधात सहगल यांनी उठवला आहे. पाहुण्याला बोलवायचं आणि मग येऊ नका म्हणायचं हे चांगलं झालेलं नाही, असं सांगताना त्यांनी ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि असहिष्णुतेचा उल्लेख केला, तो नसीरुद्दीन शहा यांच्यासह अन्यांना जो अनुभव आला, त्याच्याशी निगडीत होता. 

सहगल यांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून रद्द झालं, असा आरोप करण्यात आला होता. सहगल यांनीही तसंच सूचित केलं होतं; परंतु मुख्यमंत्री कार्यालयानं आपला साहित्य संमेलनाच्या पाहुणे ठरविण्याशी आणि त्यांचं निमंत्रण रद्द करण्याशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट केलं होतं. तरीही त्यावर वाद सुरूच होते. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्त्व आहे. सहगल यांना न बोलावलं गेल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेल्याचं त्यांनी नमूद केलं. संमेलनाला कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे सांगणं सरकारचं काम नसतं. सहगल वादाशी सरकारचं काहीही घेणंदेणं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. उद्घाटन सोहळ्यावेळी संमेलन परिसरात निषेधाचे सूर उमटताना पाहायला मिळाले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरु असतानाच विचारमंचासमोर काही महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून आपला निषेध व्यक्त केला. सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्याचा निषेध या महिलांनी व्यक्त केला. त्यानंतर तातडीनं या महिलांकडून मुखवटे काढून घेण्यात आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. हे ही चुकीचं होतं. तावडे यांच्या भाषणादरम्यान काही निदर्शकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली, त्याचं समर्थन करता येणार नाही. सहगल वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवलं जाणं गैर आहे. सहगल यांना दिलेले निमंत्रण मागं घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही, असं तावडे यांनी स्पष्ट केलं. संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दांत सरकारवर घणाघात केला. सहगल यांच्या निमंत्रणावरून झालेल्या वादाचा थेट उल्लेख न करता अडचणीच्यावेळी दिल्लीची नाही, तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे, असं म्हटलं. संमेलनापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.