Breaking News

चिटेघर लघुपाटबंधारे गेटचे काम बंद पाडण्याचा इशारा; पुनर्वसन शाखेबाबत खातेदारांनी व्यक्त केला तीव्र संताप


पाटण (प्रतिनिधी) : चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी सव्वाचारपट रकमेचा प्रस्ताव लघुपाटबंधारे विभागाने तयार करून पुढील प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडे पाठविला आहे. मात्र दीड वर्षे झाले हा प्रस्ताव रखडल्याने कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी चिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार रामहरी भोसले यांना देण्यात आले आहे. 


याबाबत ग्रामस्थांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केरा-मणदुरे विभागातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम 2000 साली सुरू करण्यात आले. त्याचवेळी सर्व शेतकर्‍यांच्या जमिनी शासनाने संपादीत केल्या. यापैकी 40 खातेदारांनी शासनाकडे पर्यायी जमिनीची मागणी करून त्यासाठी 65 टक्के रक्कम शासनाकडे भरली आहे. मात्र जमीन देण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारून देखील अद्याप प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत. यासाठी पर्याय म्हणून संबंधित खातेदारांनी शासनाकडे जमिनी ऐवजी सव्वा चारपट रक्कम मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठी सातारा येथे आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी पुर्नवसन जिल्हाधिकारी यांनी वांग-मराठवाडी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या मोबदल्याप्रमाणेच चिटेघर धरणग्रस्तांनाही मोबदला देण्याचा विचार केला जाईल. त्यासाठी आम्ही तातडीने खास बाब म्हणून प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. याची पूर्तता जलसंपदा विभागाकडून झाली असून हा प्रस्ताव अद्यापही पुनर्वसन शाखेकडेच धूळखात पडून आहे. येथील अधिकारी व कर्मचारी नेहमीच टोलवा टोलवी करत आहेत. याचा निषेध व्यक्त करत चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या खातेदारांनी धरणाच्या गेटचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, आ. शंभूराज देसाई आदींना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर यशवंत शिंदे, रामचंद्र शिंदे, लक्ष्मण शिंदे, महिपती ढोपरे, भरत सावंत, गणपती सावंत, दादासाहेब सावंत, बबन सावंत यांच्यासह 40 खातेदारांच्या सह्या आहेत.