Breaking News

नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान; पुढील आठवडयात सुनावणी


नवी दिल्ली : सीबीआयचे प्रभारी संचालक एम. नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणार्‍या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. एका एनजीओने ही याचिका दाखल केलेली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एन. एल. राव आणि न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

कॉमन कॉज आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. यावर गोगोई यांनी स्षट केले की, याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करणे अशक्य असून सुनावणी पुढील आठवड्यात होईल. सीबीआयमधील वादानंतर राव यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 10 जानेवारीला राव यांना प्रभारी पद सोपवण्यात आले होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने आलोक वर्मा यांना सीबीआयच्या संचालक पदावरून हटवले होते. या समितीमध्ये नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांचा समावेश होता.