Breaking News

काईट फ्लाईंगची संक्रांत जीवघेणी


अहमदनगर/प्रतिनिधी
एरव्ही आकाशात पक्षांची व ढगांची गर्दी दिसते. मात्र, मकर संक्रांतीच्या दिवशी वर पाहिले तर पतंगांनी आभाळ गच्च भरलेले असते. या सणात आपण पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेतो. मात्र, विहंग करणार्‍या पक्षांचा जीव जातो हे दिसत असतानाही त्याकडे काना डोळा करतो. पक्षीच काय, माणसांच्या गळ्याला मांजा लागून कित्तेक जणांचा जीव गेला आहे. मात्र, तरीदेखील काईट फ्लाईंगबाबत जनजागृती होताना दिसत नाही. त्यामुळे आजपासून पाच ते दहा दिवस मांज्याच्या जाचापासून सावधान रहावे लागणार आहे.


चायना मांज्याने शहरात अनेक पक्षांचे बळी घेतले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी कटलेला पतंग पकडताना व गच्चीहुन पतंग उडविताना तीन बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्‍वभूमिवर महापालिका व पोलीस प्रशासनाने चायना माज्यां विक्रेत्यांवर कारवाई केली होती. आज शहरात राजरोस हा जीवघेणा मांजा विकला जात आहे. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तोफखाना, कापडबाजार, दिल्लीगेट, सावेडी, बागडपट्टी, माळीवाडा अशा विविध ठिकाणी चायना मांज्या विकला जात आहे. 50 रुपयांपासून तर दिडशे रुपयांच्या बनावट चक्रीत हा मांजा दिला जातो. हात कापला तरी दोर कटत नाही. त्यामुळे अशा मांज्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चायना मांज्यांवर शासनाने बंदी घातली आहे. प्लास्टीक पतंग देखील मोठे घातक आहेत. मात्र, त्याच्या बंदीवर कोठे कारवाई होताना दिसत नाही.


कटलेली पतंग दिर्घकाळ हवेत राहते, त्यासोबत मांजा देखील सैरभैर झालेला असतो. तो झाडे, बिल्डींग, टॉवर अशा ठिकाणी अडकून तानला जातो. त्यावेळी आकाशात फिरनारे किंवा झाडांवर बसणारे पक्ष त्यात अडकले जातात. त्यांच्या विहंगाचा वेग जास्त असतो, परिणामी त्यांच्या गळ्याला फास लागून जीवास मुकावे लागते. इतकेच काय, पादचारी व वाहनचालक यांच्या गळ्यात किंवा पायात मांडा अडकून गंभीर जखमा झाल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. म्हणून आज पतंग उडविताना आपल्या आनंदासह इतरांचा व प्राण्यांचा विचार करावा. असे आवाहन तारिणी स्वयंसिद्धा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जीव घेतो, तो सण नाही

सण उत्सव कोणाचा जीव घेण्यासाठी नसतात. आपल्यामुळे पशुपक्षी व मणुष्यहानी होत असेल तर सुशिक्षीतांनी त्यावर चिंतन केले पाहिजे. पतंगप्रेमींनी चायना मांज्याचा वापर टाळावा. दिवसभर पतंग उडविण्यापेक्षा तुरतास आनंद घेऊन सामाजिक उपक्रम राबवावेत. लहान मुलांना इमारतीहुन पतंग उडविण्यास प्रतिबंध करावा. एखादा पक्षी मांजात अडकला तर त्याच्यावर उपचार करावा. प्रशासनाने जीवघेण्या मांज्यांवर बंदी घालण्यास पुढाकार घेतला पाहिजे. घरातून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाने मांज्यापासून सावधानता बाळगा.
- मिराजी साळवे (माजी विक्रिकर अधिक्षक)


कटी पतंगाचा जुगार...

शहरात झोपडपट्टी ते बड्या घरातील मुलांमध्ये कटी पतंगाची जुगार सुरू आहे. दोन गटात एकामेकांचा पतंग किती वर जातो तसेच कोण कोणाचा पतंग काटतो यासाठी मोठी रक्कम ठरविली जाते. ज्याच्या पतंग हवेत राहतो त्याला ही रक्कम दिली जाते. अशा प्रकारची ही जुगार सद्या पाईपलाईन रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात पालक मुलांना नको तसा सपोर्ट करत असून हजारो रुपये अल्पवयीन मुलांच्या हातात देतात. त्यामुळे हा जुगार ल्युडो व बिंगो गेमसारखा शहरात फोफावत चालला आहे.