Breaking News

दखल कोण जाणार अंगावर, कोण घेणार शिंगावर?भाजपनं कितीही लांगुलचालन केलं, तरी शिवसेना आपला हेका सोडायला तयार नाही. त्यामुळं दररोज भाजपवर टीकास्त्र सोडलं जात आहे. अखेर वैतागून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला युती केली, तर जागा वाढवू. अन्यथा, आपटू असा इशारा दिला आहे. शिवसेनाही त्यावर स्वस्थ बसली नाही. आता तिनंही भाजपला शिंगावर घ्यायचं ठरविलं आहे. त्यांचं असं दररोजचं नळावरचं भांडण करमणूकप्रधान चित्रपटासारखं झालं आहे.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं राष्ट्रीय पक्षांवर दबाव आणून आपल्या पदरात जास्तीत जास्त माप कसं पडेल, यासाठी प्रादेशिक पक्ष प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस आणि भाजपला या स्थितीतून जावं लागतं आहे. त्यातच बिहारमधील संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकजन पक्षापुढं झुकून भाजपनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या. जागावाटप झालं; परंतु शिवसेनेनं दबाव आणायचा कितीही प्रयत्न केला, तरी भाजप झुकायला तयार नाही. राम मंदिर, तिहेरी तलाकसारख्या विषयांवर संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकजन पक्षांनी कितीही टीका केली, तरी भाजप त्याला फारसं उत्तर देत नाही. उलट, मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर भाजप पाणी सोडायला तयार झाला. तेथील अन्य प्रादेशिक पक्ष जसे भाजपला सोडून गेले, तसंच महाराष्ट्रात झालं. असं असताना शिवसेनेला अधूनमधून धडा शिकवण्याची भाषा भाजपतून होत असते. बिहार व महाराष्ट्रात थोडासा फरक इतकाच, की तिथं भाजप आणि संयुक्त जनता दलाची राजकीय ताकद सारखीच आहे. मागच्या लोकसभेचाच फक्त अपवाद. शिवसेना आणि भाजप हे सर्वांत जुने मित्रपक्ष असताना त्यांच्यातील कटुता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून वाढते आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत हे दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी त्यांच्यात जेवढे टोकाचे मतभेद आहेत, तेवढे भाजप आणि त्यांच्या परंपरागत विरोधकांतही नाहीत. युती झाली नाही, तर भाजपचं जेवढं नुकसान होईल, त्यापेक्षा अधिक नुकसान शिवसेनेचं होणार आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदारांचा युतीसाठी आग्रह आहे. असं असलं, तरी शिवसेना दररोज भाजपची पिसं काढीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दररोज वाक् बाण सोडले जात असताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर मात्र टीका करण्याचं टाळलं जात आहे. मोदी यांना चोर ठरविण्यापर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मजल गेली आहे. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आता ही युती नको, असं वाटायला लागलं आहे. 

भाजप आणि शिवसेना आता परस्परांना सार्वजनिक कार्यक्रमांना बोलवायचं टाळायला लागली आहेत. पुणे, कल्याणच्या मोदी यांच्या कार्यक्रमांना ठाकरे यांना बोलवण्यात आलं नव्हतं. तर कोस्टल रोडच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आलं नव्हतं. आता तर मोदी ज्यादिवशी महाराष्ट्रात येत आहेत, त्याचदिवशी ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळी दौ-यावर जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर लातूर इथं झालेल्या कार्यक्रमात शाह यांनी शिवसेनेबाबत वापरलेली भाषा ही मोदी यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर आणि त्याचवेळी शिवसेनेला इशारा असल्याचं मानलं जात आहे. गेल्याच आठवड्यात खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेबरोबर युती केल्यास भाजपसोबत राहणार नाही, असा इशारा दिला होता. राणे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजपवर दबाव वाढविला होता. शिवसेनेनं त्यानंतरही भाजपवर टीका सुरूच ठेवल्यानं भाजपनं शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या राणे यांना जाहीरनामा समितीत स्थान देऊन शिवसेनेला एकप्रकारे इशारा दिला आहे. युती झाली, तर तुमच्या नाही, तर आमच्या अटीवर असा पवित्रा आता भाजपनं घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त कधीही जाहीर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन भाजपनं देशपातळीवर आणि राज्यांतही जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रात पक्षाच्या जाहीरनामा समितीसह 17 समित्यांची घोषणा करून भाजपनं निवडणुकीची पूर्ण शक्तिनिशी तयारी सुरू केली. शाह आणि फडणवीस यांनी लातूरमध्ये पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला थेट इशारे दिले. राज्यात सरकारी योजनांचे 2 कोटी लाभार्थी आहेत. त्यामुळं युती होवो अथवा न होवो, ’मॅन टू मॅन’ आणि ’होम टू होम कॉन्टॅक्ट’ मोहीम राबवा आणि एकहाती सत्ता आणा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं, तर शाह यांनी आणखी स्पष्ट इशारा देत ’कुणी मित्र सोबत आले तर ठीकच. अन्यथा विरोधकांसह त्यांच्यावरही मात करू’, असा सज्जड इशारा शिवसेनेचं नाव न घेता दिला. आगामी लोकसभा निवडणूक पानिपतच्या लढाईसारखीच आहे. हे युद्ध मात्र भाजप कोणत्याही परिस्थिती जिंकणारच, असा विश्‍वास व्यक्त करत शाह यांनी बूथ कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. लातूरमध्ये आयोजित लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली चार जिल्ह्यांच्या पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना शाह यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले.

स्वबळावर लढल्यास 2014 प्रमाणंच लोकसभेच्या 23 जागा मिळू शकतील, असा भाजपच्या सर्व्हेचा अंदाज आहे. पाच राज्यांतील निवडणुकीपूर्वी हा सर्व्हे झाला. 2014 मध्ये युतीत भाजपला 23 व शिवसेनेला 18 जागा होत्या. या वेळी एकूण 30 ते 34 जागाच मिळू शकतील असा अंदाज आहे. म्हणजे आपल्या जागा कायम राहून शिवसेनेच्या जागा घटतील, असं भाजपला वाटतं. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार युती झाल्यास भाजप-शिवसेनेला 34 जागा मिळतील, तर आघाडीला 14; मात्र वेगळं लढल्यास भाजप व मित्रपक्षाला 23, काँग्रेस मित्रपक्ष 14, राष्ट्रवादी 6 आणि शिवसेना 5 जागांवर विजय मिळवू शकेल. भाजपनं स्वबळाचा इशारा देताच शिवसेनेनं ही लगेच प्रत्युत्तर दिलं. ’शाह यांच्या मस्तवाल व उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि भाजपचा पर्दाफाश झाला आहे. ठाकरे यांनी देशातील हिंदूंच्या मनातील भावना मांडून अयोध्येत राममंदिराचा नारा दिला होता. त्यामुळं भाजपच्या पायाखालची जमीन सरकली. आता भाजप नेत्यांच्या जिभाही सरकू लागल्या. एकंदर चांगलंच झालं. आता होऊनच जाऊ द्या, कोणीही अंगावर आलं, तर आम्ही शिंगावर घेऊ. 5 राज्यांच्या निकालानंतर तसंही भाजपचं अवसान गळाले आहेच. जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. भाजपच्या धोरणांना विरोध करणा-यांना कवटाळलं जात असताना भाजपचेच मुद्दे घेऊन पुढं जाणा-या शिवसेनेची मात्र गळचेपी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. पीडीपीबरोबरची पूर्वीची युती, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकजन पक्षाचं उदाहरण शिवसेना देते. शिवसेनेच्या विरोधाची पर्वा न करता भाजपनं राणे यांना जाहीरनामा समितीत घेतलं, याचा अर्थ शिवसेनेनं समजून घ्यायला हवा. शिवसेना असेल तर युतीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका राणे यांनी घेतली होती. असं असतानाही राणे यांचा समितीमध्ये समावेश करून भाजपनं अनेकांना धक्का दिला. शिवसेनाला या माध्यमातून थेट इशाराच दिला आहे. 
 
निवडणुकीच्या तोंडावर किमान सामंजस्याची भाषा दोन्ही पक्षांनी घ्यायला हवी होती; परंतु शाह व शिवसेनेची भाषा युतीसाठी पोषक नक्कीच नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडण्यात आले आहेत. मोदी सरकारनं केलेल्या रोजगार निर्मितीचा दावा ॠसीएमआयईॠ या संस्थेच्या अहवालानं कसा खोटा ठरवला, त्याची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे. ज्या हातांनी मोठ्या अपेक्षेनं मोदी सरकारला निवडूण दिलं, त्यांना मोदी सरकारची जुमलेबाजी आता लक्षात आली असून रोजगार निर्मितीचा ढोल फुटल्यामुळं आता देशातील बेरोजगारांचे हात मोदी सरकारचे तख्त फोडण्यासाठी शिवशिवत असल्याचं या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेनेलाही खरंच युती हवी, की दबावातून जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपनं तयार व्हावं, असा शिवसेनेचा अंतस्थ हेतू आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. बिहारप्रमाणं भाजपनं आपल्याला लोकसभेच्या आणखी जागा आणि विधानसभेच्या किमान 125 जागा सोडाव्यात, असा शिवसेनेचा आग्रह असला, तरी भाजप सध्या शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊन आहे, त्या जागांत समाधान माना आणि अन्यथा पराभवाला सामोरे जा, असा इशारा देत आहे.