Breaking News

वीज वितरण कंपनीला ‘नरबळी’ हवेत का? -गजानन दसरकर


डोंगरशेवली : येथील मराठी शाळेजवळ बसवलेली डी.पी.वर सतत फॉल्ट होवून येथील गावकर्‍यांना रोज अंधारात रात्र काढावी लागते. वीज वितरण कंपनी कर्मचार्‍यांचे डोंगरशेवली गावातील कुठल्याही डी.पी.वर लक्ष नसल्यामुळे तेथील गावकर्‍यांना वीज समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याठिकाणी डी.पी.वरील लोड कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जुन्या पाण्याच्या टाकीजवाळ नवीन डी.पी. बसवण्यात आली असून ती शोभेची वस्तू बनली आहे. यामुळे शाळेजवळी डी.पी.वर लोड वाढला असून सबस्टेशन डोंगरशेवली येथील कर्मचारी वारंवार हजर राहत नसून डी.पी.ला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी गावकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्याठिकाणी मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीला नरबळी हवेत का? असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.


वरील डी.पी.मध्ये कोणीही येवून आपल्या सोयीने जीवाची पर्वा न करता चालू लाईनमध्ये वायर जोडून लाईन आणण्याचा प्रयत्न गावकरी दररोज करतात. यामध्ये हा धोका एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. वारंवार गावकर्‍यांनी बुलडाणा येथील कनिष्ठ अभियंता शेखदार यांना निवेदन देवून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक गावकर्‍यांच्या मागणीकडे दूर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येवून नवीन डी.पी. लवकरात लवकर सुरु करण्यात यावी व विद्युत पुरवठा सुरु करण्यात यावा. 33 केव्ही सबस्टेशन डोंगरशेवली येथून वरवंड, डोंगरखंडाळा, देव्हारी, खेर्डी या ठिकाणी विद्युत पुरवठा केल्या जात असून सदर परिसरात नेहमी फॉल्ट होत असल्यामुळे ते दुरुस्ती करण्याकरीता या भागातील सर्वच लाईन बंद करण्यात येते. त्यामुळे डोंगरशेवली ग्रामपंचायतने डोंगरखंडाळा येथील पुलावर एबी स्वीच बसविण्याची मागणी केलेली आहे परंतु वरिष्ठांनी याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्यामुळे परिसरातील सर्वच गावातील लोकांना एमएसईबीपासून समस्या निर्माण होत आहे. येत्या आठ दिवसात वरील समस्या दूर न झाल्यास गावकर्‍यांच्या वतीने तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.