Breaking News

....अखेर नरवणेत एटीएमसेवेस प्रारंभ


नरवणे (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील नरवणे गावात पहिले एटीएम मशीन दाखल झाले असून एटीएमसेवा सुरू झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, नरवणेतील शशिकांत वसंत काटकर हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबविणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. किराणा व कापड दुकान, ई सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरीकांना शासकीय दाखले काढून देणे, शेतकरी विमा काढून देणे, केबल व्यवसाय तसेच इतर अनेक व्यवसाय त्यांनी गावात उभे करून अनेकांना रोजगार व विविध सुविधा उपलब्ध करून देऊन गावात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. 


सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून सरकारवर नाराज होण्यापेक्षा आपण सरकारी किंवा खाजगी स्वरूपाच्या सेवा लोकांना गावातच उपलब्ध करून देणे यातच त्यांनी आपले काम समजले. सध्या त्यांच्या प्रयत्नातून गावात वक्रांगी एजन्सीच्या सर्व सुविधा केंद्रामार्फत गावात एटीएम मशीनही बसविण्यात आले आहे. त्याचे उदघाटन नुकतेच सरपंच दादासाहेब काटकर, पोलीस पाटील दत्ता काटकर व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले। आता नरवणेकरांना खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठ्या गावांना जाण्याची गरज पडणार नाही किंवा शंभर-दोनशे उसनवारी करण्याची गरज नाही. आपल्या खात्यातील रक्कम ते गावातच एटीएम मशीन मधून काढू शकतात, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.