Breaking News

आढळराव पाटलांचे अजित पवारांना आव्हान; शिरूरमधून लढाच; शरद पवारही घाबरले, तिथे यांचे काय?


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्याविरुद्ध आगामी निवडणूक लढवावीच. शब्द फिरवू नये, असे आव्हान या मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले आहे.

आढळराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. रविवारी शिरूर येथील एका कार्यक्रमात पक्षाने आदेश दिल्यास आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात लढण्यास तयार आहोत आणि रिंगणात उतरल्यास विजयी होवू, असे उद्गार अजित पवार यांनी काढले होते. त्यासंदर्भात आढळराव पाटील यांनी अजितदादांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, की अजित पवार यांनी आता आपला शब्द फिरवू नये. त्यांच्याशी दोन हात करण्यास मी तयार आहे. 2009 साली खुद्द शरद पवार माझ्याविरुद्ध लढण्याची तयारी करीत होते; परंतु या मतदारसंघातील जनतेचे माझ्यावरील प्रेम पाहिल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला. तसे अजित पवारांनी करू नये. मी याच क्षणाची वाट पाहत होतो. अजित पवारांनी शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहू नये. त्यांनी आता माझ्याशी लढावेच. इतरवेळी पेक्षा जास्त मताधिक्क्याने मी विजयी होईल.

पवार घराण्याने नेहमीच माझ्याविरोधात कारवाया केलेल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपसोबत युतीची चर्चा अद्याप सुरू असल्याचा दावाही आढळराव-पाटील यांनी केला. शिवसेना-भाजपदरम्यान युती झाली नाही, तर हिंदू मतांचे विभाजन होईल, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना-भाजप यांच्यात विविध मुद्द्यांवरून दरी निर्माण झाल्यामुळे युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आढळराव म्हणाले, भाजपसोबत युती होईल आणि युती झाली नाही, तर मोठा फटका बसेल. युती व्हावी, ही शिवसेनेच्या सर्व खासदारांची इच्छा आहे.