Breaking News

चाफळच्या सीतामाईकडेे वाणवसा घेण्यासाठी गर्दी; ‘वसा घ्या वसा, हळदी कुकंवाचा’ म्हणत महिलांनी साजरी केली मकरसंक्रात


पाटण (राजेंद्र लोंढे यांजकडून) : ’तीळगुळ घ्या, गोड- गोड बोला’, ’वसा घ्या वसा, हळदी कुकंवाचा वसा’, असे म्हणत हजारो महिलांनी तीर्थक्षेञ चाफळ (ता. पाटण) येथील सीतामाईच्या यात्रेत मंगळवारी अखंड सौभाग्याचा वसा घेतला आणि मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात मीहलांच्या मोठ्या उपस्थितीत सीतामाईंची यात्रा पार पडली.

मकरसंक्रातीनिमित्त येथील श्रीसीतामाई यात्रेसाठी संपूर्ण राज्यभरातून हजारो सुहासिनी श्रीसीतामाईसमोर स्नेहाचा व अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी सकाळपासूनच चाफळ नगरीत दाखल होत होत्या. त्यांच्याकडून एकमेकींना हळदी-कुंकू लावताना जणू मंदीराचा संपूर्ण परिसरच हळदी कूंकवाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून येत होते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा महिला भाविकांच्या संख्येत वाढ झाली होती. गटागटाने महिला मंदीर परिसरात वसा पूजन करत होत्या. श्रीराम दर्शनाबरोबरच समर्थ सभागृहातही दर्शनासाठी महिलांची मोठी रांग लागली होती.

देवस्थान ट्रस्टने महिला भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी बँरेगेटस उभी केली होती. तसेच इतर सोयीसुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. ध्वनीक्षेपकाद्वारे महीलांना सूचना देण्यात येत होत्या. पोलिसांनी काही अपवाद वगळता वाहतूक सुरळीत ठेवली होती. देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनाने चांगल्या नियोजनाने यात्रा व्यवस्थित पार पाडली. स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा, दर्शन रांगेची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, दुकानांची सुयोग्य मांडणी यामुळे महीला भाविक समाधान व्यक्त करत होत्या. भाविकांच्या सोयीसाठी कराड, पाटण, सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई, मेढा येथून राज्य परिवहन महामंडळाने जादा एसटी गाड्यांची सोय केली होती. याशिवाय खासगी वाहने व वडापमुळे महीलांना चाफळ येथे येताना कोणतीही गैरसोय जाणवली नाही. उंब्रजचे स.पो.नि.प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 150 ते 200 पोलीस कर्मचारी,50 ते 60 महीला पोलीस, व श्रीसमर्थ विद्यामंदीरच्या एनसीसीच्या छात्रांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.