Breaking News

अग्रलेख-साता समुद्रापार डंका


भारतीय संघ भारताच्या भूमीवर विजय मिळवितो आणि परदेशात मार खातो, असे चित्र यापूर्वी वारंवार दिसले. त्याला कारण पूर्वी भारतीय खेळपट्या आणि परदेशातील खेळपट्यांमध्ये कमालीचा फरक होता. भारतीय हवामान आणि परदेशातील हवामानातही फरक असतो. त्याचा परिणाम होत असला, तरी भारतीय क्रिकेटपटूंचे यश हे कधीच दुर्लक्षण्यासारखे नव्हते; परंतु गल्लीत दादा आणि बाहेर शेळी अशी आपली प्रतिमा होती. अर्थात अजित वाडेकर यांच्या संघाने वेस्ट इंडीजला कॅरेबियनच्या वाळूत व क्रिकेटचा जन्मदात्या इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची किमया केली होती. कपील देवच्या संघाने विश्‍वचषक जिंकून भारताचा दबदबा निर्माण केला होता. 

जगातील मोजक्या देशांत क्रिकेट खेळले जात असून त्याला जागतिक स्वरुप आलेले नाही. ब्रिटनने ज्या ज्या देशांवर राज्य केले, तिथे तिथे हा खेळ रुजला. त्यातही दक्षिण आशियायी देशांत क्रिकेट फोफावले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशात जसे व्यावसायिक क्रिकेट रुढ झाले, तसे भारतात झाले नव्हते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांना पराभूत करण्यास भारतीय संघास यश मिळत नव्हते, ऑस्ट्रेलियात जाऊन विराट कोहलीच्या संघाने सात दशकांनंतर हा ठपका पुसून टाकला आहे. असे असले, तरी अजूनही दक्षिण आफ्रिकेत मात्र भारतीय संघाला अजून तिथल्या भूमीवर जाऊन कसोटी जिंकता आलेली नाही. गेल्या सात दशकांत भारतीय संघ कमकुवत होता असे नाही, तर ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य होता. तीच स्थिती दक्षिण आफ्रिकेच्या संघाची होती. 1970-80 च्या दशकात लॉईड-रिचर्ड्स-रॉबर्ट्स-होल्डिंगच्या विंडीज संघाचे क्रिकेट विश्‍वावर निर्विवाद वर्चस्व होते. ती जागा ऑस्ट्रेलियाने कमावली खरी; पण गेल्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या कॉलरला हात घालण्याची क्षमता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दाखवली होती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टप्प्याटप्प्याने फुलत होते. त्याने कसोटी क्रिकेट, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत संघाला अव्वल स्थान मिळवून दिले. एखाद्या दादाला त्याच्या बिरादरीत जाऊन धोपटण्याचा पराक्रम काही औरच असतो. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा त्यांच्याच होमपीचवर नक्षा उतरवला. त्याचा आनंद भारतीयांना होणे स्वाभावीक आहे. त्यामुळे तर या संघावर कौतुकाचा आणि सवलतींचा वर्षाव चालू झाला. 

यजमान संघाला त्याच्या मैदानात, त्याच्या प्रेक्षकांसमोर धोपटणे हा पराक्रम असतो, म्हणून कोहली आणि त्याच्या सहका-यांचे कौतुक केले पाहिजे. भारतीय संघ याआधी ऑस्ट्रेलियात 1-1 अशा बरोबरीपर्यंत पोहोचला होता; मात्र कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीला, चेंडूला उसळी देणार्‍या खेळपट्ट्यांवर आपण खेळून जिंकू शकतो, हे सप्रमाण सिद्ध केले. आजपर्यंत भारतीय संघाची परदेशातील ताकद ही फिरकी गोलंदाजी होती; मात्र अलीकडच्या काळात भारताकडे जसप्रीत बुमराह, महंमद शमी, उमेश यादव अशी वेगवान गोलंदाजांची कुमक आहे, त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांच्या चिरफळ्या केल्या. याअगोदर भारताच्या वेगवान गोलंदाजीचा धसका दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांच्या घरच्या मैदानावर घेतला होता. इंग्लंडनेही भारतीय गोलंदाजांना घाबरून खेळपट्ट्यांवरील गवत काढले होते. ऑस्ट्रेलियानेही या वेळी तेच केले; मात्र रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि त्यांच्या साथीला ऑफ स्पिनर हनुमा विहारी याने अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय फलंदाजीला या वेळी बहर आला. चेतेश्‍वर पुजारा अप्रतिम खेळला. दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि योयो टेस्टमध्ये त्याच्या फिटनेसबाबत शंका उपस्थित केल्यानंतर तो स्वस्थ बसला नाही. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटच्या अनुभवाची शिदोरी घेऊन तो मैदानात उतरला आणि धावांची बरसात करत राहिला. त्यामुळे चेतेश्‍वर पुजारा-विराट कोहली-अजिंक्य रहाणे असा भरवशाचा फलंदाजीचा कणा भारतीय संघाला लाभल्याचे दिसले. अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका व इंग्लंड दौर्‍यात फारसे यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चांगली सुरुवात करूनही तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही; परंतु तरीही कर्णधार आणि संघ व्यवस्थापकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्याला संधी दिली. त्या संधीचे त्याने आता सोने करून दाखविले. गेल्या वर्षभरात 7-8 सलामीवीर बदलले. भारतीय संघ किती तरी दिवस योग्य सलामीच्या फलंदाजाच्या शोधात होता. मयांक अग्रवालने काही प्रमाणात हा प्रश्‍न सोडवला. ऋषभ पंत हा तरुण तडफदार यष्टिरक्षक ही या दौर्‍यातील भारतीय संघाची कमाई. धोनीनंतर कोण, या प्रश्‍नाचे उत्तर आता मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सार्वभौमत्वाच्या यशाचे एक रहस्य होते अ‍ॅडम गिलख्रिस्ट. यष्टीपाठी उत्तम कामगिरी करणार्‍या गिलख्रिस्टची 6 व्या क्रमांकावरची स्फोटक फलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना गारद करायची. तसा आक्रमक फलंदाजीचा ठोसा मारण्याची धमक आणि कुवत ऋषभ पंतने दाखवली आहे. कोहलीचे आक्रमक नेतृत्व हेदेखील भारताच्या क्रिकेटमधील सार्वभौमत्वाच्या दिशेने निघालेल्या विजयरथाचे प्रमुख कारण आहे. कोणत्याही परदेशी संघासमोर त्यांच्या देशात जाऊनही तो दबून खेळत नाही. कुणी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला तर तो उसळून उठतो, पेटून उठतो. चेंडूचे जसे असते, तसे त्याचे आहे. चेंडू जोरात आपटला, की त्याचे उसळणेही तेवढेच जोरात असते. प्रतिस्पर्ध्यांना ताकदीने भिडण्याचा विश्‍वास कोहलीच्या देहबोलीने इतर भारतीय खेळाडूंना दिला. पराभवाला न घाबरता डावपेच टाकत जायचे, लढत राहायचे, हा नवा मंत्र विराटच्या नेतृत्वाने भारतीय संघाला दिला. नवोदित खेळाडूंवरचा टाकण्यात आलेला विश्‍वास ते अपयशी ठरल्यानंतरही पाठीवर पडणारा कोहलीचा हात सहकार्‍यांना नवी ऊर्जा देऊन जातो. ऑस्ट्रेलियातल्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1ने ऐतिहासिक विजय झाला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा आशिया खंडातला पहिला देश ठरला आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. भारत व पाकिस्तानमध्ये कितीही कटुता असली, तरी जेव्हा जगातील अन्य देशांविरोधात भारत किंवा पाकिस्तान जिंकतो, तेव्हा दोन्ही देशातील सामान्य जनताही त्याला दाद देत असते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानंही भारताच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा हा जगतला सगळ्यात कठीण दौरा असतो. ऑस्ट्रेलियाला संपूर्ण मालिकेत दबावात ठेवणे ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. मागच्या 30 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानात फॉलोऑनची नामुष्की भारताने आणली. विराटने व्यक्त केलेली प्रतिक्रियाही तितकीच महत्त्वाची आहे. ‘यापेक्षा जास्त अभिमानाचा क्षण माझ्या आयुष्यात आला नव्हता. या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. टीममधल्या खेळाडूंमुळेच माझी मान अभिमानानं उंचावली आहे,’ असं विराटने केले आहे. भारतीय संघाने मिळवेलला हा विजय 1983 सालच्या वर्ल्ड कप विजयापेक्षा मोठा असल्याचे वक्तव्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. भारताने आत्तापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत. अफगाणिस्तान आणि आयर्लंड या देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला आहे; पण या दोन्ही देशांमध्ये भारताचे सामने झालेले नाहीत. हे दोन देश आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन तिथे कसोटी मालिका जिंकल्या, तर जगजेतेपदाचा खरा अभिमान बाळगता येईल.