Breaking News

प्रताप गंगावणे यांना साताराभूषण पुरस्कार प्रदान


सातारा (प्रतिनिधी) : आज सर्वत्र चित्रपट, मालिका निर्मितीत लेखन करणार्‍या लेखकांना कमी लेखले जाते. असे असताना लेखनात उत्तुंग यश मिळवणार्‍या प्रताप गंगावणे यांना मिळालेला साताराभूषण हा पुरस्कार म्हणजे भविष्यात मिळणार्‍या मोठ्या, श्रेष्ठ पुरस्कारांची नांदीच असेल, असे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. 

रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने लेखक प्रताप गंगावणे यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले, गंगावणे यांच्या पत्नी सौ. तेजश्री गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू कला सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रताप गंगावणे यांना सातारा भूषण पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. डॉ. कोल्हे म्हणाले, प्रताप गंगावणे यांच्यामुळेच संभाजी महाराजांवरील मालिका गाजत आहे. त्यांच्या आगळ्या वेगळ्या लेखनाच्या शैलीतून निर्माण होणार्‍या कथेतील प्रसंग अतिशय दर्जेदार आहेत. 
माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले म्हणाले, प्रताप गंगावणे यांच्या लेखनाला भविष्यात अधिक यश मिळो, त्यांच्या हातून अशाच महनीय व दर्जेदार कलाकृती निर्माण व्हाव्यात.

ज्येष्ठ चित्रपटनिर्माते व करसल्लागार अरुण गोडबोले म्हणाले, प्रताप गंगावणे यांनी आपल्या लेखणीतून एक आदर्श गारुडच निर्माण केले आहे. मात्र आज त्यांना साहित्यिक म्हटले जात नाही हे दुर्देव आहे. साहित्य चळवळीचे नेतृत्व करणारांनी साहित्याचे निकष तपासून पहावेत व अंतर्मूख होउन विचार करावा. त्यांच्या वास्तववादी, प्रतिभासंपन्न लेखनाचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा.

सत्कारास उत्तर देताना पुरस्कारार्थी प्रताप गंगावणे म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी सरप्राईज आहे. मी आज कृतार्थं आहे. आज माझ्या लेखनाला हे पुरस्काराचे स्वरुप प्राप्त झाले. मी कोणतेच राजकारण कोणत्याच कलाकारासाठी केले नाही. सरळपणे व प्रामाणिकपणे लिहीत राहिलो. त्यातूनच संपूर्ण देश फिरलो. अनेक भाषा शिकलो. त्याचा उपयोग मला लेखन करताना झाला. आपल्या सर्वांच्या पाठबळावर मी आणखी गतीने लिहीत राहीन. 

सुत्रसंचलन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी प्रताप गंगावणे यांच्या आई श्रीमती बहिणाबाई गंगावणे, पी. एन. जोशी, प्राचार्य रमणलाल शहा, सह निर्माते घन:श्याम राव, दिग्दर्शक विवेक देशपांडे, विलास सावंत, रमेश राकडे, महेश काकेाटे, दादाजी सुर्वे नंदू पाटील, गणेश जाधव, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.