Breaking News

तिहेरी तलाकवरून राज्यसभेत गोंधळ
नवी दिल्लीड/ प्रतिनिधी :

तिहेरी तलाक बंदी विधेयकावरून सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. हे विधेयक छाननीसाठी निवड समितीकडे पाठवून देण्याची जोरदार मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. या प्रकरणी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मुद्यावरून विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्याने राज्यसभेचे कामकाज दोन जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

लोकसभेत गेल्या गुरुवारी (दि.27) दीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक बंदी विधेयक मंजूर करण्यात आले होते. सोमवारी हे विधेयक राज्यसभेत मांडून चर्चा होणार होती; मात्र हे विधेयक निवड समितीकडे पाठवून देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हे विधेयक खूप महत्वाचे असून त्याची छाननी झाली पाहिजे. त्यासाठी ते निवड समितीकडे पाठवून द्यावे, अशी मागणी केली. विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याआधी ते निवड समितीकडे पाठविणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी, सरकार या विधेयकावर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. हे विधेयक मंजूर होऊ नये, म्हणून काँग्रेस अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे.