Breaking News

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचा दुचाकी मोर्चा; साखर कारखान्यांच्या गटकार्यालयासमोर घोषणाबाजी


कराड (प्रतिनिधी) : साखर उत्पादक कारखान्यांकडून शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी रक्कम मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ओगलेवाडी येथून दुचाकी मोर्चा काढण्यात आला. सोनहिरा, वर्धन अ‍ॅग्रो या कारखान्यांच्या ओगलेवाडी येथील गट कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनासाठी कार्यकर्ते व शेतकरी गट कार्यालयासमोर येताच तेथील कर्मचारी मात्र कार्यालयाला कुलूप लावून निघुन गेले होते. पुढे हा मोर्चा बनवड़ी येथील सह्याद्रि कारखान्याच्या गट ऑफिस, कोपर्डे हवेलीमार्गे यशवंतनगर येथील सह्याद्रि कारखान्याच्या गेट समोर घोषणाबाजी केली. यावेळी सर्व शेतकर्‍यांनी एकत्र जमून ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, एकरकमी एफआरपी न देणार्‍या कारखानदारांचा धिक्कार असो आदी घोषणा देण्यात आल्या. 

पुढे हा मोर्चा मसूर येथील केन अ‍ॅग्रो, ग्रीन पॉवर गोपूज या कारखान्यांच्या गट ऑफिसवर नेण्यात आला. तेथे कर्मचार्‍यांना बाहेर घेवून ऑफिसचे शटर बंद करण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यात स्वाभिमानीचे कराड उत्तरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, कृष्णा मदने, सुभाष नलवडे, योगेश झांबरे, सज्जन माने, नागराज शिंदे, प्रसाद धोकटे, अमर कदम, शंकर चव्हाण, बापू शिंदे, मधुकर शिंदे, विनोद जाधव, योगेश डूबल यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.