Breaking News

संस्कारक्षम पिढीसाठी ग्रंथोपासना आवश्यक : डॉ. मिरजकर


मायणी (प्रतिनिधी) : पुस्तक हे मस्तक घडविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. आज घराघरात मोबाईल संस्कृतीने संवाद नष्ट केला आहे. मात्र भावी पिढी योग्य पद्धतीने घडवायची असेल तर मुलांच्या हातात उत्तम उत्तम ग्रंथ दिले पाहिजेत. तरच आपल्या समाजाचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. निमसोड येथील श्री सदगुरू वाचनालातर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या युवक सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मुख्याध्यापक पोपट मिंड होते. 

प्रारंभी चंद्रकांत मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संत नामदेव हे समाजात ज्ञानाचा प्रसार करू पाहणारे पहिले सुधारक होते, हे स्पष्ट करताना डॉ. शामसुंदर मिरजकर म्हणाले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे व्रत संत नामदेवांनी घेतले. हाच वसा वारसा सगळ्या संतांनी आपापल्या परीने जोपासला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, म्हणणारे जगद्गुरु संत तुकाराम यांनी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आज आपण आपल्या मुलांच्या हातात अभ्यासाशिवाय इतर वाचनाची पुस्तके देण्याची गरज आहे. संस्कारक्षम वयात जर चांगल्या पुस्तकांचे वाचन झाले, तर ती मुले आयुष्यभर नीतिमूल्यांची जोपासना करतात. समाजातून आदर्श व्यक्तिमत्त्वांचा र्‍हास होत असताना ग्रंथ हेच आजच्या घडीला आपले गुरु आहेत.