Breaking News

धनंजय मुंडेंविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र; शेतकर्‍याला दिलेला धनादेश न वटल्याने फसवणुकीचा गुन्हा


बीड/ प्रतिनिधीः जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकर्‍याची जमीन घेतल्यानंतर त्याला दिलेला धनादेश न वटल्याने दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अखेर अंबाजोगाईच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अंबेजोगाई तालुक्यातील शेतकरी मुंजा किसनराव गिते (रा. तळणी) यांची तीन हेक्टर 12 आर जमीन जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी घेण्यात आली होती. गिते यांच्या मुलासह चौघांना साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याची हमी देण्यात आली होती; मात्र संबंधित जमिनीसाठी दिलेला धनादेश वटला नाही आणि नोकरीचा शब्दही पूर्ण झाला नाही, म्हणून मुंडे याच्याविरोधात या शेतकरी कुटुंबाची फसवणूक केल्या प्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करून दोषारोपांतर दाखल करावे, यासाठी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर बर्दापूर पोलिसांनी याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर दोष ठेवत दोषारोपपत्र दाखल केले. 


गिते यांची जमीन 50 लाखांत घेण्यात आली. जमिनीचे खरेदीखत 7 जून 2012 रोजी करण्यात आले. धनंजय पंडितराव मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मिक बाबूराव कराड (पांगरी), सूर्यभान हनुमंतराव मुंडे (तळेगाव ता. परळी) यांच्या नावे करण्यात आले. शिवाय मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती.

मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमाणे प्रथम एक लाख व नंतर सात लाख 81 हजार 250 रुपयांचा धनादेश दिला. परळीच्या बँक ऑफ महाराष्ट्रचा आमदार धनंजय मुंडे यांनी 40 लाख रुपयांचा धनादेश दिला. गिते यांना दिलेला धनादेश न वटताच परत आला आणि तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम देण्यात आली नाही, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.