Breaking News

सट्टा लावणार्‍या चौघांना मुंबईत अटक


मुंबई : सांताक्रूज पोलिसांनी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याच्या गुन्ह्याखाली 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे आरोपी क्रिकेटवर सट्टा लावत होते. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी शेकडो मोबाईल, एक लॅपटॉप, आणि एक मोबाईल कम्युनिकेटर हस्तगत केले आहेत.

अटक केलेल्या आरोपींमध्ये वेलजी शहा उर्फ बिपीन इंद्रप्रस्थ हा कुख्यात बुकी असून त्याच्यासह जितेंद्र जाधव, नारायनलाल रेबारी, देवीलाल यांचा समावेश आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे आरोपी ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवत होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया-भारत क्रिकेट सामन्यांवरही हे लोक सट्टा लावतात का, याचा तपास पोलीस करीत आहेत. मोबाईल कम्युनिकेटरने एका वेळेस 15 किंवा त्याहून अधिक मोबाईल जोडले जाऊन एकाच वेळेस शेकडो लोकांशी संवाद साधून देशभरात सट्टा बाजारातील माहिती पुरविली जाते. सध्या सट्टा बाजारात मोबाईल कम्युनिकेटरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने याचा फायदा बुकींना मोठ्या प्रमाणावर होत आहे.