Breaking News

तरूणांनी जीवन का जगावं हे हेमलकसाला जावून शिकावे : नाना पाटेकर

कराड (प्रतिनिधी) : जगायचं कशासाठी हे अनेकांना माहिती नाही. मला खुप काय करायचाय, मात्र काय करायचाय हेच तरुणाईला माहिती नाही. अजंठा आणि वेरळुच्या तुटलेल्या मुर्तीत सौदर्य शोधण्यापेक्षा बाबा आमटे यांनी होते नव्हते, त्या सर्वांचा त्याग करुन आनंदवनच्या माध्यमातुन समाजसेवा सुरु केली. तरुणांनी जीवन का जगावं हे हेमलकसाला जावुन आमटे कुटुंबीयांकडुन शिकले पाहिजे. समाजाला आज त्याची नितांत गरज असल्याची अभिनेते व नाम फौउंडेशनचे नाना पाटेकर यांनी तरूणाईला सांगितले.

घारेवाडी (ता.कराड) येथील बलशाली युवा हदय संमेलनात आज चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यासह परराज्यातुन आलेल्या युवकांना मार्गदर्शन केले. शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, कर्‍हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डाँ. सुभाष एरम, कराड मर्चंट समुहाचे सत्यनारायण मिणीयार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अभिनेते श्री. अनासपुरे म्हणाले, अलिकडे तरुणांमध्ये फोनवर सेल्फीमॅनिया सुरु झाला आहे. सेल्फीमुळे नोकरी मिळत नाही किंवा दोन घास अन्न मिळत नाही. त्यामुळे तो सोडुन देण्याची गरज आहे. आपल्या जीवनाचा फुकटचा हेलपाटा होवु नये यासाठी शिवमच्या संमेलनात सहभागी झाला आहात, हे फार महत्वाचे आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे हे मनात असले पाहिजे. पाण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. जेथे पाऊस पडतो तेथे पाऊसच पडला नाही. त्यामुळे यावर्षी भीषण टंचाईची स्थिती आहे. त्यातुन निसर्ग बोलु लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आतातरी आपण सावध होणार आहोत का हा प्रश्‍न आहे. तरुणांची उर्जा सकारात्मक दिशेने वळवणे हे राष्ट्रीय काम असुन ते इंद्रजीत देशमुख यांच्या माध्यमातुन शिवम प्रतिष्ठान करत आहे हे फार मोठे काम आहे. चित्रपट अभिनेते समृध्दी जाधव यांनी आभार मानले.