Breaking News

उत्तरप्रदेश व उत्तराखंडमध्ये विषारी दारूचे 109 बळीसहारनपूर : उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस विषारी दारूमुळे अनेक जणांचा मृत्यू होत आहे. सहानपूरमधील उमाही गावात गेल्या 48 तासात 78 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झाला आहे. हरिद्वारच्या बालूपूरमध्ये हे सर्व दारू प्यायले होते. मृत व्यक्ती हे बालूपूर आणि सहारनपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत. तर मेरठ, सहारनपूर, डेहराडून या ठिकाणच्या रुग्णालयातील 90 पेक्षा जास्त रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दारूमुळे लोक मरत असताना जिल्हा प्रशासन मात्र, मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आकडे लपवत आहे. एवढी मोठी घटना घडली असताना सुद्धा प्रशासनाला अजूनपर्यंत विषारी दारू तयार करणार्‍या आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे राज्यात दारूचा कारभार हा पोलिसांच्या सहकार्यांने चालू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
पोलिसांना दारू बनवणारे आणि ती विकणारे दोघांचीही माहिती आहे. मात्र, पोलीस त्यांच्याकडून हप्ता वसुली करतात त्यामुळे ते त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. नागरिकांनी दारू विक्री करणार्‍यांची माहिती पोलीसांना दिल्यानंतरही ते आरोपींना पैसे घेऊन सोडून देतात. त्यामुळे पोलिसांनी वेळेतच कच्ची दारू विक्रीवर बंदी घातली असती तर ही घटना घडलीच नसती, असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मृतांचा आकडा शंभरच्या वर गेल्याने योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. अवैधरित्या दारु विकणार्‍यांविरोधात 15 दिवसांची कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सहारनपूरमध्ये आतापर्यंत 39 जणांना अटक केली आहे. तर 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 297 गुन्हे दाखल झाले असून 175 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सहारनपूरमधील 10 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.