Breaking News

गुणवरे गोळीबार प्रकरणी चौघांना अटक; 10 लाखाची सुपारी घेतल्याची कबुली : एलसीबीची कारवाई


सातारा (प्रतिनिधी) : गुणवरे, ता. फलटण येथील गोट्या भंडलकर याच्यावर गोळ्या झाडणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ला यश आले आहे. तब्बल एक महिन्यानंतर आरोपींच्या कर्जत जि. अहमदनगर येथून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अमर धनराज बेंदरे, वैभव सुर्यभान बेदरे (दोघे. रा. सुपे,ता.कर्जत,जि. नगर) ज्ञानेश्‍वर नारायण साबळे (रा.शिंदा,ता. कर्जत) कल्याण गावडे (रा.गुणवरे ,ता. फलटण) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गोट्यावर गोळ्या झाडण्यासाठी कल्याण गावडे याच्याकडून दहा लाखाची सुपारी घेतल्याचे कबुल केले असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.

दि.28 डिसेंबर रोजी गुणवरे-बरड जाणार्‍या रस्त्यावर गुलाब उर्फ गोट्या भंडलकर (रा. गुणवरे, ता. फलटण) याच्यावर पाठीमागून आलेल्या चौघांनी गोळीबार केला होता.
यात गोट्या गंभीर जखमी झाला होता. त्याला फलटण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जबाबावरून अज्ञातांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात गोट्याच्या नातेवाईकांनी पुणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या विरोधात मोर्चा काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिस विभागाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले होते. गोट्याच्या नातेवाईकांनी केलेली मागणीमुळे गुणवरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुणवरे येथील कल्याण गावडे व गोट्या भंडलकर यांच्यात जमिनीच्या ताब्यावरून वाद होता. कल्याण याच्या वडिलांची जमीन जावली तालुक्यातील काही लोकांना पुर्नवसन कायद्याने मिळाली होती, मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने लोक तिथे जमीन कसण्यासाठी आले नव्हते. त्यातील काही जमीन कल्याण याने साठेखत करून खरेदी केली होती. ती जमीन व अन्य काही हिस्सा गोट्या व त्याच्या काही मित्रांनी दमबाजी करून साठेखताने ताब्यात घेतली होता. तेव्हापासून गावडे व भंडलकर यांच्यात सतत वाद सुरू होते. याच वादाच्या कारणातून कल्याण गावडे याने अहमदनगर जिल्ह्यातील मित्रांना गोट्याचा गेम करण्याची सुपारी दिली होती. त्यातूनच दि.28 डिसेंबर रोजी गोट्यावर बरड दरम्यान गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास फलटण ग्रामीण पोलिसांच्याकडे होता. मात्र आरोपी हाती लागत नसल्याने जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी तपासची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली होती. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी तपासी अधिकार्‍यांना तपासाच्या योग्य त्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोट्याचे फोन कॉल व इतर महत्वपुर्ण बाबीवरून अहमदनगर जिल्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, सोमनाथ लांडे, सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, पोलिस हवालदार उत्तम दबडे, विजय शिर्के, तानाज़ी माने, संतोष पवार, नितीन गोगावले, मुबिन मुलाणी, निलेश काटकर, प्रविण फडतरे, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला.