पात्र शेतकरी कुटुंबांच्या माहिती संकलनासाठी कालबद्ध कार्यक्रम; 10 फेब्रुवारी पर्यंत यादी होणार तयार


सातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावर होणार आहे. याकरिता तलाठ्याच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांची समिती राहणार आहे. 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान ही समिती गावनिहाय पात्र खातेधारक शेतकर्‍यांची यादी तयार करणार असून 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे.

पात्र शेतकरी कुटुंबांची निश्‍चिती करणे आणि याकरिता राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कृषि गणना 2015-16 व नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाकरिता तयार करण्यात आलेली माहिती प्राप्त घेवून विहित नमुन्यात नोंद करणे. योजनेची गावात व्यापक प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात गावातील शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही माहिती संबंधितांच्या सहमतीने प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची राहणार आहे. त्यानंतर 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविल्या जातील. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबांच्या यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून पात्र शेतकरी कुटुंबांची अंतिम यादी 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान तहसीलदार कार्यालयात सादर केली जाईल.

ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षांखालील मुले म्हणजे एक कुटुंब असे वर्गीकरण करण्यात येणार असून 1 फेब्रुवारी 2019 रोजी खातेधारकाने धारण केलेले क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. ग्रामस्तरीय समितीने दिलेला निर्णय मान्य नसल्यास तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येईल.उप विभागीय (प्रांत) अधिकारी हे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर उपविभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक हे समितीचे सदस्य राहणार आहेत. तसेच तहसीलदार हे समितीचे समन्वय अधिकारी तथा नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामस्तरावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे, तालुकास्तरीय विविध विभागांमध्ये या योजनेच्या दृष्टीने समन्वयक साधणे व सर्व ग्राम समित्या कालबद्ध कार्यक्रमानुसार कामकाज करीत असल्याबाबत दैनंदिन आढावा घेण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीची राहणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमीत आढावा घेतला जाईल. पात्र शेतकरी (कटुंबांनी) या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget