Breaking News

पवनचक्की साहित्याच्या चोरीप्रकरणी 12 जणांवर दरोड्याचा गुन्हा


पाटण (प्रतिनिधी) : मोरणा विभागातील धनगरवाडा (काहीर), ता. पाटण येथे सुझलॉन या पवनचक्की कंपनीचे दोन लाख 80 हजाराचे लोखंडी साहित्य ट्रकमधून चोरीच्या उद्देशाने घेवून जाताना त्यांना अटकाव केल्याने कंपनीच्या कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आले. याप्रकरणी पाटण पोलिसांनी दहा ते बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. याची फिर्याद विजय सुभाष मोरे (रा. शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) यांनी पाटण पोलिसात दिली आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोरणा विभागातील धनगरवाडा (काहीर), ता. पाटण गावच्या हद्दीतील सुझलॉन या पवनचक्की कंपनीचे चॅनेल ब्लेड, हब ब्लेड, मेटल ब्लेड अशा सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरून ते हायड्रोलीक मशीनच्या सहाय्याने दोन ट्रकमध्ये भरून संशयित आरोपी राजेश शेलार, अरूण सावंत (दोघे रा. पळशी), राजू यादव (उत्तर प्रदेश), राजू चांद लिंगारेकर (रा. कडेगाव), फरादखान व सोयलखान (दोघे रा.कराड) यांच्यासह अन्य दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी सुझलॉन कंपनीचे कर्मचारी सचिन घाडगे (म्हावशी ता. पाटण) व संतोष मुळीक (रा. सातारा) यांनी या चोरट्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या संशयित आरोपींनी या दोन्ही कर्मचार्‍यांना काठी, चॉपर, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील टाटा सुमो गाडीच्या (क्र. एमएच 11 एएल 9359) काचा फोडून चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चोरीची माहिती पाटण पोलिसांत दिली असून त्यानुसार संबंधितांवर याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी दोन संशयित राजू यादव व राजू लिंगारेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि उत्तमराव भापकर करत आहेत.