Breaking News

पोलिसस्टेशन सुशोभीकरण भ्रष्टाचारप्रकरणी 14 फेब्रुवारीला सुनावणी; सुशोभीकरणाच्या माहितीसाठी आज अंतिम मुदत


पारनेर/प्रतिनिधी
परवानगी शिवाय व बेकायदेशीर मार्गाने लाखो रुपयांचा निधी गोळा करून निघोज व पारनेर पोलिस ठाण्यांचे सुशोभीकरण करून त्यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठातील दाखल याचिकेबाबत सुनावनी करताना न्यायालयाने पंचवीस जानेवारी पर्यंत पोलिस अधिक्षक अहमदनगर यांच्याकडे म्हणने मागविले होते. परंतु वेळेत म्हणने सादर न केल्याने न्यायालयाने आता 12 फेब्रुवारीला त्यांना म्हणणे मांडण्याची अंतिम मुदत दिलेली आहे. दि.14 ला यावर सुनावनी होणार आहे.

बेकायदेशीर पणे केलेल्या सुशोभीकरणाची तक्रार पोलिस महासंचालक, लाचलुचपत विभाग, आयकर यांचेकडे केली होती. याबाबतचा पाठपुरावाही याचिकाकर्त्यांनी केला होता. माहिती अधिकारात सुशोभीकरणाची माहिती राज्य माहीती आयोगापर्यंत मागवूनही माहीती देण्याचे टाळण्यात आल्याने यात मोठा गैरव्यवहार असल्याचा संशय आल्याने या प्रकरणी येथील माहीती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे व बबन कवाद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पोलिस अधिक्षक अहमदनगर यांनी तक्रारदारांच्या तक्रार अर्जाची तब्बल दहा महिण्यांनी दखल घेवून निघोज, पारनेर पोलिस ठाण्यांच्या सुशोभीकरण तक्रारीची चौकशी तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षकांनी पुर्ण केली असून तसा अहवाल सादर केला असल्याचे व त्यामध्ये दोन लाखांचा निधी पोलिस अधिक्षक अहमदनगर कार्यालयाकडून तर उर्वरीत लाखो रुपयांचा निधी आम्हाला समाजातील थोर दानशुरांनी वस्तुरूपात दिलेला असल्याचे त्यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. याबाबतचे एक पत्र नुकतेच तक्रारदारांना मिळाले आहे. आपल्या तक्रार अर्जाची दखल घेवून ते दप्तरी करत असल्याचे कळविले आहे. कायद्याच्या रक्षकांकडूनच एखाद्या सर्वसामान्याच्या तक्रार अर्जाचे उत्तर मिळण्यासाठी जवळपास वर्षाचा कालावधी लागत असेल व त्यासाठी उच्च न्यायालयात जायची वेळ येत असेल तर कुंपनच शेत खात असल्याची भावना याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली.

आय.एस.ओ.मानांकन पोलिस ठाणे

पारनेर पोलिस ठाण्याचे सुशोभीकरण एकीकडे वादात सापडलेले असताना पारनेरच्या पोलिस ठाण्याला मात्र, नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. सर्वोच्च गुणवत्तेचे प्रतिक म्हणुन दिले जाते. गेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकिय कार्यक्रमात जलसंधारण तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी ते स्वीकारले होते.