Breaking News

शाळेच्या बसला अपघात; 19 विद्यार्थी जखमी


पालघर / प्रतिनिधीः
पालघर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला माहीमजवळच्या पाणेरी नदीजवळ अपघात झाला. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. बस चालकाची प्रकृतीही गंभीर आहे. ‘सर जे.पी. इंटरनॅशनल स्कूल’च्या बसला हा अपघात झाला. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ही बस झाडावर आदळली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

‘जे. पी. इंटरनॅशनल स्कूल’ची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी तर पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक बस सहा ऐवजी पाच चाकांवर धावल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या घटनेकडे शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला होता. आता याच शाळेच्या बसला अपघात झाला आहे.