Breaking News

चक्क 19 भाषांचे ग्रंथलेखक अवतरले विजयनगरच्या शाळेत


म्हसवड (प्रतिनिधी) : इयत्ता चौथीच्या वर्गात भाषा विषयात ‘होय मी सुद्धा’ नावाचा पाठ समाविष्ट आहे त्या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे, माण तालुक्यातील विजयनगर (पर्यंती) या शाळेतील इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक बालाजी जाधव हा पाठ शिकवत होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना वाटले की या लेखकांशी आपल्याला बोलत येईल का, भेटता येईल का आणि मग काय या शाळेतील गुगल इनोव्हेटर शिक्षक बालाजी जाधव यांनी त्यांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधून स्काइपच्या मदतीने जो पाठ शिकत आहोत. त्या पाठाच्या लेखकांना वर्गातील प्रोजेक्टरवर हजर केले आणि ज्यांनी पाठ लिहला त्यांच्याच तोंडून तो पाठ प्रत्यक्ष अनुभवताच विद्यार्थ्यांना आभाळाएवढा आनंद झाला.

 मुलांनी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या जसे तुम्ही गोष्टी कशा लिहता, त्यावर त्यांनी अगदी मजेशीर उत्तर दिले,माझ्या हातांनी लिहतो, तुम्ही किती पुस्तके लिहीली आहेत, यावर त्यांनी एकूण 90 पुस्तके लिहली असे सांगितले आणि मग मुलांना वाटले आपल्याला ही पुस्तके लिहता येतील का आणि असा प्रश्‍न विचारला त्यावर त्यांनी अगदी मजेशीर सांगितले की पुस्तके कशी लिहायची म्हणजे, उजव्या हाताने या उत्तरावर सर्व मुले मोठ्याने हसली. एक मुलीने विचारले की, कोणकोणत्या भाषेत तुम्ही पुस्तके लिहली. त्यावर त्यांनी सांगितले की मी 19 भाषांमध्ये पुस्तके लिहली आहेत. त्यांनी मुलांना कोणती पुस्तके वाचता? असे विचारले, मुलांनी विविध पुस्तकाची नावे सांगितले, त्यांनी बादली आणि तारा असे दोन शब्द दिले, आणि गोष्ट तयार करा असे सांगितले. त्यावर अगदी काही सेकंदात मुलांनी गोष्ट तयार करून सांगितली. मुलांना लेखक म्हणजे अगदी कोणीतरी वेगळी व्यक्ती असेल अशी कल्पना होती. मात्र राजीव तांबे यांनी मुलांना अगदी सहज समजेल अशा भाषेत हसत हसत, विविध आवाजात अगदी मूल होऊन संवाद साधल्याने आमचे विदयार्थीसुद्धा आता आम्हीही लेखक होऊ शकतो असा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण झालाय, हेच तर शिक्षणातून होणं अपेक्षित आहे, सोबतच राजीव तांबे यांनी त्यांच्या लहानपणीच्या विविध गोष्टी, शालेय जीवन, लिहायला कसे शिकलो आणि सध्या रोज सहा तासाहून जास्त लेखन करतो असे सांगितलं आणि मुलांना खूप नवल वाटलं, पण पाठ तर सहजच शिकवून झाला. मात्र प्रत्यक्ष लेखक वर्गात येऊन मुलांशी गप्पा मारत तो पाठ शिकवल्याने मुलांना खूप आनंद झाला. मुख्याध्यापक भोजा कळेल यांनी तांबे सरांना शाळेत येण्याचे निमंत्रण दिले. राजीव तांब यांनीही ते आनंदाने स्वीकारून महिन्यात दोन वेळा तुमच्या मुलांशी बोलण्यास आवडेल असे मत मांडले.