सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रश्‍नांसाठी दि.21 पासून आमरण उपोषण; दुप्पट अनुदानाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन : रविंद्र कामत यांचा इशारा


सातारा (प्रतिनिधी) : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ संक्रमण अवस्थेत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या, शासनमान्य सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना सरकार जोपर्यंत दुप्पट अनुदान वाढीबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत गुरुवार दि.21 पासून कराड येथील प्रितीसंगमावर आमरण उपोषणाचा तीव्र इशारासार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी (कृती समिती) असोसिएशनचे राज्य संघटक रविंद्र कामत यांनी दिला.

कराड येथे नुकतीच राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या पदाधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत कामत यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. कामत म्हणाले, एकीकडे वाचन चळवळ टिकविण्यासाठी भरभरुन बोलले जाते, राज्यात पुस्तकांचे गांव निर्माण केले जाते, राज्याचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ’ गांव तिथे ग्रंथालय’ संकल्पना राबवून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला, अशा राज्यात ग्रंथालयांची अवस्था विदारक आहे. सध्याच्या तुटपुंज्या अनुदानावर वाचनालय व ग्रंथालय चालवणे फार जिकरीचे झाले आहे. छत्रपती शाहूमहाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्राचा ढोल वाजवणार्‍या कालच्या, आजच्या बेगडी राजकारण करणार्‍या राज्यकर्त्यांना ग्रंथालय चळवळीचे महत्व कधीच समजले नाही, हे या चळवळीचे दुर्देव आहे. एरवी मात्र हेच शासनकर्ते ग्रथांचे महत्व मात्र ऊठ सूट सांगताना थकत नाहीत, पण ही चळवळ लोकाभिमुख व्हावी यासाठी मात्र मूग गिळून असतात, असे खेदाने म्हणावेस वाटते. त्यामुळे ग्रंथालयाच्या दुप्पट अनुदान वाढीबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत.दि.21 फेब्रुवारी 2019 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कराड येथील समाधीस्थळाजवळ तीव्र आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कामत यांनी दिला आहे. शासनव्यवस्थेशी यापूर्वीही संघर्ष करावा लागला होता आणि आजही आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नसून या उपोषणप्रसंगी ग्रंथालय चळवळीतील लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुदान दुप्पटीचा निर्णय होईपर्यंंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही कामत यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget