Breaking News

देशात अघोषित आणीबाणी : आंबेडकर; शिवाजी पार्कवर 23 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण परिषद घेण्याचे सुतोवाच


मुंबई : देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू असल्यामुळे, साहित्यिक, कलावंत, राजकारणी, आणि विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्तेत असलेले केंद्र सरकार या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे. त्यामुळे देशातील जनतेने याची दखल घ्यावी, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना काल सरकारच्या धोरणाविरोधात बोलताना रोखण्यात आले होते. या प्रकाराचा आंबेडकरांनी निषेध केला. ते म्हणाले, आज देशभरात सरकार विरोधातला आवाज दाबला जात आहे. पश्‍चिम बंगालमध्येसुद्धा भाजपाने जे केले तोही याचाच भाग होता. कार्यक्रमासाठी कोर्टातून सहजपणे परवानगी मिळत असताना ती न घेता भाजपने आपली हुकूमशाही वृत्ती आणि मनमानीपणा दाखवत पश्‍चिम बंगालमध्ये गोंधळ निर्माण केला. अमोल पालेकर हे कला आणि सांस्कृतिक धोरणाच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना रोखले गेले, ही कृतीसुद्धा हुकूमशाही वृत्ती आहे.

राज्यातील आघाडीसंदर्भात आंबेडकर म्हणाले, काँग्रेस जोपर्यंत संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा देत नाही, तोपर्यंत आघाडीसाठीची चर्चा पुढे जात नाही. ज्या जागांवर त्यांचे उमेदवार नाहीत आणि ज्या जागा मागील 3 निवडणुकांत ते हरलेले आहेत, अशा जागा मागतोय. तरीही काँग्रेस संघाच्या अजेंड्यावर काही बोलत नाही त्यामुळे आम्ही हाच अजेंडा निवडणुका झाल्यावरसुद्धा राखू शकतो. अमित शाह यांनी त्यांच्या पक्षांकडून राज्यातल्या सगळ्या जागांवर निवडणूका लढवून जिंकण्याचे वक्तव्य केले होते. यावर आंबेडकर म्हणाले, अमित शहा यांनी राज्यातल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात. त्यातील किमान 40 जागांवर व्हीव्हीपॅट मशीन लावून आणि त्याची प्रिंट मिळेल, अशी व्यवस्था करावी, म्हणजे ते किती यशस्वी होतील ते पाहू असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

दरम्यान, शिवाजी पार्कवर 23 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण परिषद घेणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली आहे. समुद्रावरील जलवाहतूक, पर्यटन, आधुनिक सागरी व्यापार, सागरी नोकर्‍या, सागरी नौदल, नौदल यामध्ये मच्छीमारांना 30 टक्के आरक्षण हवं आहे. आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

क्लस्टर आणि एसआरएला विरोध

कोस्टल रोड प्रकल्प, न्हावा शेवा, सी लिंक, शिवस्मारक प्रकल्प यात बाधित होणार्‍या मच्छीमार बांधवांचं पुनर्वसन करून, भूसंपादन कायदा 2013 नुसार त्यांना चार पट फायदा देण्यात यावा. तसेच आधुनिक बंदरे, आधुनिक बोटी, बिनव्याजी कर्ज मच्छीमारांना देण्यात यावं, सागरी उद्योग, नौदलाचे सागरी शिक्षण देण्यासाठी मरिन विद्यापीठ सुरु करण्यात यावे. ‘मुंबईच्या मूळ निवासींच्या जागांवर डोळा असल्यामुळे तिथे एसआरए प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण गावठाणाच्या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबवता येणार नाही. मुंबईच्या मूळ निवासींना मुंबई बाहेर काढण्याचं हे षडयंत्र असल्याची घणाघाती टीका अ‍ॅड. आंबेडकरांनी यावेळी केली.