Breaking News

सोलापुरात पोलिसांची दरोडेखोरांमध्ये चकमक; पोलीस निरीक्षकावर तलवारीने हल्ला ; 3 पोलीस जखमी, 1 दरोडेखोर ठार


सोलापूर : तुळजापूर रस्त्यावर उळे गावात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये झटापट झाली. यामध्ये दरोडेखोरांनी पोलीस निरीक्षकावर तलवारीने हल्ला केला आहे. तर पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला आहे.
सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उळे गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान गस्त घालताना पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली.

यामध्ये 3 पोलीस जखमी झाले आहेत. तर 1 दरोडेखोर ठार झाला आहे. गस्त घालत असताना पोलिसांना पाठीमागे नंबर प्लेट नसलेली आणि पुढची नंबर प्लेट अस्पष्ट असलेली (एमएच-12-सीडी-3933) कार दिसली. तेव्हा पोलिसांची त्यांची चौकशी केली. त्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये खासगी इंडिको गाडीतून गस्त घालणार्‍या पोलीस निरीक्षकाच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यावेळी दरोडेखोरांना पोलिसांची ओळख पटली. पोलिसांनी एका दरोडेखोराला पकडून गाडीत घालत असताना दरोडेखोराने पोलिसांना, ’साहेब चुकले’ म्हणत त्याने हातातील तलवारीने पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. यामध्ये पाटील हे जखमी झाले. त्यावेळी पोलीस अधिकारी पाटील यांनी हल्ला करणार्‍या दरोडेखोरावर गोळीबार केला. दरोडेखोर गोळीबारामध्ये जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस कर्मचारी दराडे आणि फडतरे यांची दरोडेखोरांशी झटपट सुरुच होती. त्यावेळी इतर दरोडेखोर पळून गेले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच मोबाईल फॉरेन्सिक इन्विस्टेगेशन व्हॅन घटनास्थळी दाखल झाली असून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याबरोबरच मृत दरोडेखोराची ओळख पटवली जात आहे.