Breaking News

काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा; चकमकीत 8 नागरिकही जखमी


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त मोहिमेत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केलम भागात तीन ते चार दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती.

दहशतवाद्यांविरोधातील या अभियानात लष्कर, पॅरा फोर्स, सीआरपीएफच्या पथकांचा समावेश होता. दरम्यान परिसरात शोधमोहिम अद्यापही सुरू आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. मात्र, चकमकीदरम्यान 8 स्थानीक नागरिक देखील जखमी झाले आहेत.

सुरक्षा दलाला केलम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी केलम गावाला चारही बाजुनी वेढले. त्यानंतर परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. त्याचवेळी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारताच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पहाटेपासून सुरू असलेल्या या चकमकीत अखेर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत दोन घरांना रॉकेटने उद्ध्वस्त केलं. या चकमकीत मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असण्याची शक्यता आहे. यामुळे केलम भागातील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. याशिवाय भागातील इंटरनेट आणि रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. जवळपास 6 तास सुरू असलेली शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी महिन्यात सुरक्षारक्षकांना मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातही पुलवामात लश्कर-ए-तोयबाच्या जिल्हा कमांडरचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले होते. पुलवामा जिल्ह्यातील चकुरा भागात सेना आणि पोलीस एका संयुक्त गस्तीवर असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. कुलगामात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अल-बद्रच्या सरगना जीनत उल-इस्लामसह दोन दहशतवादी मारले गेले होते.